Prabha Atre passes away | किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन | पुढारी

Prabha Atre passes away | किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. (Prabha Atre passes away)  प्रभा अत्रे यांना आज पहाटे ३.३०च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अविवाहित होत्या. त्यांची बहीण उषा यांचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले. प्रभा अत्रे मुंबईतील माटुंगा येथील त्यांच्या निवासस्थानी अधून मधून येत असत तर काही काळ पुण्यातही वास्तव्यात असत.

त्यांना २०२२ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉक्टर प्रभा अत्रे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, सर्वश्रेष्ठ आणि आघाडीच्या गायिका होत्या. किराणा घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. प्रभा अत्रे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला आणि विशेषतः किराणा घराण्याच्या गायनकलेला नवीन दिशा दिली. भारतीय संगीत कलेला पाश्चिमात्य देशात लोकप्रियता मिळवून देणाऱ्या त्या पहिल्या गायिका होत्या. १९६९ पासून त्या पूर्णवेळ संगीत मैफिली करू लागल्या. आवाज लावण्याची पद्धत, सुस्पष्ट शब्दोच्चारण आणि परिणामकारक भावना अविष्कार यांच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीतात नवीन जाणीव आणली. शास्त्रीय संगीताची अखंड सेवा करणाऱ्या अत्रे या रविवारी मुंबईत होणाऱ्या हृदयेश आर्टच्या गान प्रभा महोत्सवात सहभागी होणार होत्या. अत्रे यांनी देश-विदेशात शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिली केल्या शास्त्री संगीताच्या प्रचारासाठी गुरुकुल पद्धतीने अनेक शिष्यही घडवले. शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांची अनेक पुस्तके मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित झाली आहेत.

संगीत या एकाच विषयावर एकाच वेळी डॉ. प्रभा अत्रे यांची अकरा पुस्तके प्रकाशित झाली होती. हा त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांच्या पुस्तकामुळे संगीत रसिकांना संगीतकला समजून घेण्यास मदत झाली. त्यांनी ‘डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन’ची स्थापना करून आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जबाबदाऱ्या निभावल्या. प्रतिभावान विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलाकार म्हणून आकार देण्यासाठी तसेच संगीत रसिकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘स्वरमयी गुरुकुल’ची स्थापना केली. डॉ. प्रभा अत्रे यांना १९९० मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये संगीत नाटक अकादमी, २००२ मध्ये पद्मभूषण आदी प्रतिष्ठित पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

Back to top button