शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक भरतीसाठी आंदोलन | पुढारी

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक भरतीसाठी आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मराठी माध्यमाच्या उमेदवारांना डावलून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या भावी शिक्षकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवत, त्यांना गराडा घातला. यावेळी पाटील यांनी मी तुमचे निवेदन घेण्यासाठी आलेलो नाही. तुमच्या खात्याचा मंत्रीही नाही. शिक्षण आयुक्तांची भेट घेण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठी आलो आहे, अशा शब्दांत उत्तर दिले.
डीटीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरतीबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह बिगर इंग्रजी शाळेत इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी राज्यातील उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना, मंत्री चंद्रकांत पाटील हे शिक्षण आयुक्त चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी आक्रमक झालेल्या उमेदवारांनी पाटील यांचा ताफा अडवत, शिक्षक भरतीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री पाटील यांनी निवेदन स्वीकारून उमेदवारांचे म्हणणे ऐकून घ्यावे तसेच त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी महिला उमेदवारांनी केली. त्यावेळी पाटील म्हणाले की, मी तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत बोलायचे टाळल्याचे असोसिएशनच्या संतोष मगर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button