कोल्हापुरात 7 वर्षांत सात हजार नवे फ्लॅट | पुढारी

कोल्हापुरात 7 वर्षांत सात हजार नवे फ्लॅट

सतीश सरीकर

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे केंद्र, कोकणात जाणारा मार्ग आणि जवळच कर्नाटक यामुळे कोल्हापूरला ‘डिमांड’ आले आहे. परिणामी येथील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकही वाढत आहे. सद्य:स्थितीत कोल्हापुरात सुमारे 90 लाख चौरस फूट बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. 2030 पर्यंत आणखी 50 ते 60 हजार चौरस फूट बांधकाम परवानगीसाठी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात सात वर्षांत सात हजार नवीन फ्लॅट उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे, मुंबईकरांची कोल्हापुरात गंतवणूक

जिल्ह्यातील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईत स्थायिक झाले आहेत. परंतु अनेकांनी कोल्हापूर शहरात गुंवतणूक करून ठेवली आहे. जमिनीबरोबरच मोठ्या प्रमाणात फ्लॅट घेऊन ठेवले आहेत. वेगवेगळ्या भागात हे फ्लॅट आहेत. संबंधित मालकांनी हे फ्लॅट भाड्याने दिले आहेत किंवा कुलूपबंद ठेवले आहेत. सुट्टीला कधीतरी त्या फ्लॅटमध्ये संबंधित लोक राहण्यासाठी येतात.

रिअल इस्टेटमध्ये 1 बीएचके, 2 बीएचके, 3 बीएचके, डुप्लेक्सबरोबरच आता चक्क 3 हजार चौरस फुटापेक्षा जास्त एरिया असलेले फ्लॅटही तयार केले जात आहेत. अपार्टमेंटमध्ये एका मजल्यावर एकच फ्लॅट असा ट्रेंड आला आहे. यात मुंबईसह परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त असलेल्या नागरिकांची गुंतवणूक होत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात अशा व्हीआयपी अपार्टमेंट उभारल्या जात आहेत.

दोन लाख चौ. फुटांच्या टाऊनशिप…

शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त आलेल्या अनेकजणांना कोल्हापुरात प्रॉपर्टी असावी, असे वाटते. त्यातूनच अनेक अधिकार्‍यांनी फ्लॅट, जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे. हद्दवाढ झाली नसल्याने 66.82 चौ.कि.मी. क्षेत्रफळातच कोल्हापूर व्हर्टिकल वाढत आहे. जागा अपुरी असल्याने तब्बल दोन लाख चौरस फुटाच्या टाऊनशिपची बांधकामेही होणार आहेत. अशा पाच स्कीम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 2030 पर्यंत आणखी फ्लॅट तयार होतील, असे क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी सांगितले.

Back to top button