गँगस्टर शरद मोहोळच्या खूनासाठी मुळशीत गोळीबाराचा सराव | पुढारी

गँगस्टर शरद मोहोळच्या खूनासाठी मुळशीत गोळीबाराचा सराव

पुणे: पुढारी वृत्तसेवा : ओठावर नुकतेच मिसरूड फुटलेला साहिल उर्फ मुन्ना पोळेकर सुडाने पेटलेला होता. आपला मामा नामदेव कानगुडे याच्यासाठी त्याची काहीही  करण्याची तयारी होती. शरद मोहोळच्याच परिसरात तो वास्तव्यास आहे. सहा महिन्यापासून त्याने मोहोळ टोळीत प्रवेश करण्यास सुरूवात केली होती. मात्र शरदने त्याला दुर केले होते. तरी देखील पोळेकर याने आपले प्रयत्न सोडले नाहीत. दररोज तो शरदच्या इतर साथीदारांसोबत त्याच्याकडे जात होता.

शेवटी त्याने शरद सोबत जवळीक निर्माण केली. काही दिवसात तो त्याचा खास झाला. त्याच्यासोबत बॉडीगार्ड प्रमाणे फिरू लागला. दिड महिन्यापासून तो शरदच्या मर्जीत राहू लागला. मात्र त्याच्या डोक्यात वेगळीच योजना होती. अखेर शुक्रवारी त्याने आपल्या योजनेला मुर्त रुप दिले. एरवी गर्दीच्या गराड्यात असलेला शरद मोजक्याच लोकांसोबत कार्यालयाकडून घराकडे निघाला असताना, पाठीमागून पोळेकर याने तीन गोळ्या झाडल्या, तर इतर साथीदारांनी समोरून दोन गोळ्या झाडल्या.

शरद जागेवरच कोसळा. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. शरदच्या खूनचा कट पोळेकर, मामा कानगुडे आणि इतरांनी अगोदरपासूनच रचला असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यासाठी प्रकाश नावाच्या एका व्यक्तीकडून तीन पिस्तूले आणि अकरा काडतूसे खरेदी केली. शरदचा अचून वेध घेता यावा म्हणून पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी मुळशीत गोळीबाराचा सराव केल्याची देखील पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिस शरद मोहोळच्या खूनाच्या पाठीगाने इतर कोणत्या टोळीचा हात आहे का हे देखील पडताळून पाहत आहेत.

गुन्हे शाखेचे ऑपरेशन अन् आरोपी आठ तासात जेरबंद

शरद मोहोळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार, मोहोळ टोळीचा प्रमुख म्हणून त्याची ओळख. त्याच्याच परिसरात त्याचा खूून करून आरोपींनी पळ काढला होता. त्यांना बेड्या ठोकण्याचे पोलिसांसमोर मोठा आव्हान होते. आरोपी शस्त्र सज्ज होते. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन आठ पथके तयार केली. प्रत्येक पथकाला काम विभागून देण्यात आले.

त्यासाठी एक सुत्रबद्ध नियोजन तयार केले. खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, कर्मचारी चेतन शिरोळकर यांना बातमीदारामार्फत आरोपी हे साताराच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उपायुक्त अमोल झेंडे आणि उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी टोलनाक्यावर संपर्क साधून तेथील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यामध्ये मामा नामदेव कानगुडे दिसून आला. त्यानंतर तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकांनी अ‍ॅक्टीव्ह होत ऑपरेशन सुरू केले.

त्यासाठी सातारा पोलिसांची मदत घेण्यात आली. आरोपींनी पळ काढू नये म्हणून मुळशी, खेडशिवापूर, शिरवळ, आनेवाडी टोल नाका, राजगड, वाई परिसरासह तब्बल आठ ठिकाणी शस्त्रसज्ज नाकाबंदी लावण्यात आली. याचवेळी खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांचे पथक आरोपींचा पाठलाग करत होते. पुणे-सातारा रोडवर किकवी जवळ आरोपींच्या दोन्ही गाड्या वाघमारे यांना दिसून आल्या. आरोपीकडे पिस्तूले होती. त्यामुळे वाघमारे यांनी प्रसंगावधान राखत शस्त्रसज्ज होऊन आरोपींकडे धाव घेतली. काही वेळातच त्यांना पकडून बेड्या घातल्या.

हेही वाचा

Back to top button