शिक्षक भरतीच्या जागांचे 15 जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार | पुढारी

शिक्षक भरतीच्या जागांचे 15 जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची जाहिरात प्रक्रिया अखेर सुरू झाली असून काही जिल्हा परिषदांनी पदभरतीची जाहिरात दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 12 हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे. परंतु, येत्या 15 जानेवारीपर्यंत शिक्षक भरतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना दिल्यानंतर आता जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जाहिराती आलेल्या जिल्हा परिषदांमध्ये सध्या इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना झुकते माप देण्यात आल्याचा आरोप शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केला आहे. त्यावर संबंधित अधिकार्‍यांनी आत्तापर्यंत निम्म्याच जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या आहेत. आणखी जिल्हा परिषदांच्या जाहिराती येणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देण्यात येणार आहे, असे सांगितले.

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे 20 हजार पदे रिक्त आहेत. परंतु, रिक्त पदांच्या 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु, काही आमदारांनी रोष्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला. त्यामुळे 10 टक्के जागा बाजूला ठेवून 70 टक्के पदांची जाहिरात काढणार येणार आहे. असे असले तरी साधारण 30 हजारांच्या आसपास जागा भरल्या जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

त्यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांच्या रोष्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता काही मोठ्या खासगी संस्थाच्या रोष्टरची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 10 दिवसांमध्ये संबंधित संस्थांची रोष्टरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन त्या संस्थाच्या जाहिराती देखील प्रसिध्द होतील. त्यानंतरच यंदा नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

  • आतापर्यंत 12 हजारांहून अधिक जागांसाठी जाहिरात: भरतीमध्ये सर्व माध्यमाच्या उमेदवारांना समान संधी
  •  अद्यापही निम्म्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती नाहीतच

हेही वाचा

Back to top button