कोल्हापूरला लागलीय ‘मधुरक्रांती’ची चाहूल! | पुढारी

कोल्हापूरला लागलीय ‘मधुरक्रांती’ची चाहूल!

सुनील कदम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती साकारली, त्याच्यापाठोपाठ सहकार, साखर आणि श्वेतक्रांतीही आकाराला आली. आता जिल्ह्याला ‘मधुरक्रांती’ची चाहूल लागली असून, मधाचे उत्पादन 2 टनांवरून 10 टनांपर्यंत वाढले आहे. मधनिर्मिती क्षमतेचा पूर्ण वापर झाल्यास 500 टनांपर्यंत मधनिर्मिती होऊन या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला 25 ते 50 कोटी रुपयांचा बूस्टर डोस मिळू शकतो.

7,685 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख 17 हजार हेक्टर म्हणजे सुमारे 20 टक्के वन क्षेत्र आहे. याशिवाय 5 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीखाली आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता चंदगड, आजरा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, पन्हाळा आणि शाहूवाडी या मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त तालुक्यांमध्ये कृत्रिम मधनिर्मितीस फार मोठा वाव आहे.

इथल्या जंगलांमध्ये जेवढी जैवविविधता आढळून येते, तेवढी जैवविविधता देशातील अन्य कोणत्याही जंगलांमध्ये नाही. इथल्या जंगलांमध्ये 1,800 प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात आणि जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही न आढळून येणार्‍या 300 प्रकारच्या औषधी वनस्पती केवळ याच जंगलांमध्ये आढळून येतात. मधनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या बहुतांश प्रकारच्या वनस्पती आणि फूलझाडे येथील जंगलांमध्ये आणि आजूबाजूच्या शेत-शिवारांमध्ये आढळून येतात. इथल्या जंगलांची जैवविविधता विचारात घेता संपूर्ण राज्यात या जिल्ह्याला कृत्रिम मधनिर्मितीसाठी फार मोठा वाव असल्याचे दिसते.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हळूहळू मधमाश्या पालन व नैसर्गिक मध उत्पादन व्यवसाय वाढताना दिसत आहे. जिल्ह्याची मधनिर्मिती क्षमता वार्षिक जवळपास 500 टनांची असतानाही सध्या जिल्ह्यात तयार होणार्‍या मधाचे प्रमाण केवळ 10 टन इतकेच आहे; पण हळूहळू ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने या व्यवसायाकडे वळताना दिसत असून, नजीकच्या काही वर्षांत जिल्ह्यात ‘मधुरक्रांती’ साकारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज खुल्या बाजारातील मधाचे दर प्रतिकिलो 400 ते 700 रुपयांपर्यंत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्याच्या मधनिर्मिती क्षमतेचा पूर्णपणे वापर झाला, तर जिल्ह्याच्या अर्थकारणात 25 ते 50 कोटी रुपयांची भर पडू शकते.

Back to top button