राज्यात यात्रा-जत्रेतील टुरिंग टॉकीज उरल्या फक्त 64; व्यवसाय संकटात | पुढारी

राज्यात यात्रा-जत्रेतील टुरिंग टॉकीज उरल्या फक्त 64; व्यवसाय संकटात

सुवर्णा चव्हाण

पुणे : ‘खूशखबर… खूशखबर… टुरिंग टॉकीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार हा चित्रपट…’ अशी घोषणा कानावर पाडायची अन् आपल्याकडच्या यात्रा-जत्रेत टुरिंग टॉकीजचे (तंबू थिएटर) आगमन झाल्याचे कळायचे. काही वर्षांपूर्वी टुरिंग टॉकीजमध्ये गावकर्‍यांना वेगवेगळे चित्रपट पाहायला मिळायचे; पण सध्या टुरिंग टॉकीजचा व्यवसाय संकटात असून, पूर्वी 100 वर असणारी टुरिंग टॉकीजची संख्या आता 64 वर आली आहे.

गेल्या काही वर्षांत 36 टुरिंग टॉकीज बंद पडले आहेत. वीज बिल, विविध कर, कामगारांचे वेतन, जागेचे भाडे असे विविध अवाढव्य खर्च तसेच पोलिसांकडून रात्री चित्रपटांचे खेळ चालवण्यास परवानगी नसल्यामुळे हा व्यवसाय आर्थिक नुकसानीत आहे. या परिस्थितीत आता टुरिंग टॉकीज चालक-मालकांना सरकारकडून अनुदानाची अपेक्षा आहे. गावोगावी, खेड्यापर्यंत चित्रपट पोहोचविण्याचे काम टुरिंग टॉकीज या व्यवसायाने केले. अनेक दशकांचा प्रवास या व्यवसायाने पाहिला.

आजही हा व्यवसाय सुरू आहे. पण, या व्यवसायाला आता संकटाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र टुरिंग टॉकीज असोसिएशनचे अध्यक्ष संजय धाडवे म्हणाले की, टुरिंग टॉकीज हा पिढीजात व्यवसाय आहे. आताच्या घडीला या व्यवसायाला उतरती कळा आली आहे. टुरिंग टॉकीज चालविणे चालक-मालकांना कठीण होत असून, या क्षेत्रातील सर्व चालक-मालक आणि कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. आजही टुरिंग टॉकीजमध्ये चित्रपट दाखविण्यासाठी वितरकांकडून आम्हाला चित्रपट दिले जातात. पण 28 खेळांसाठी 18 ते 25 हजार रुपये शुल्क भरणे परवडणारे नाही. सरकारने टुरिंग टॉकीजला किमान दोन लाख दरवर्षी अनुदान द्यावे.

सध्या इथेच टुरिंग टॉकीज

सध्या फक्त वाशिम, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये टुरिंग टॉकीज सुरू असून, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये टुरिंग टॉकीजला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

टुरिंग टॉकीज चालक-मालकांच्या मागण्या

  • एक खिडकी योजनेंतर्गत परवाने मिळावेत
  • सरकारकडून दरवर्षी
  • दोन लाख रुपयांचे
  • अनुदान मिळावे
  • यात्रा-जत्रांमध्ये रात्रीही चित्रपटांच्या खेळास परवानगी द्यावी

महाराष्ट्रात टुरिंग टॉकीज हा व्यवसाय नामशेष होत चालला आहे. यासाठी राज्य सरकारकडून टुरिंग टॉकीज मालकांना वार्षिक अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहोत. सरकारचे जे उपक्रम आणि जाहिराती आहेत, त्याही आमच्या माध्यमातून गावोगावी, खेडेपाड्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने त्यांना जाहिराती द्याव्यात, यासाठीचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे.

– बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

गावातील यात्रा-जत्रामध्ये टुरिंग टॉकीज चालक-मालकांना सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. चित्रपटांचे 28 खेळ चालविले जातात. शहरी भागात टुरिंग टॉकीजला फारसा प्रतिसाद नसून, ग्रामीण भागापुरताच हा व्यवसाय मर्यादित झाला आहे.

– रामप्रसाद सुरुसे, टुरिंग टॉकीज चालक, बुलडाणा

 

हेही वाचा

Back to top button