गल्लीबोळात मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत ; आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हे यांच्यावर टीका | पुढारी

गल्लीबोळात मोर्चे काढून प्रश्न सुटत नाहीत ; आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हे यांच्यावर टीका

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  गल्लीबोळात मोर्चे काढून शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाहीत. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने काहींना शेतकर्‍यांचा कळवळा आला आहे. आक्रोश मोर्चा काढणारे पाच वर्षे कुठे होते? असा थेट प्रश्न उपस्थित करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे शनिवारी (दि. 6) शिवसेना कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभा होणार असून येथील सभेच्या तयारीची पाहाणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि.4) कार्यकर्त्यांसमवेत केली.

या वेळी आढळराव पाटील म्हणाले, चांगल्या टोनमध्ये भाषण केले, डरकाळी फोडली म्हणजे चांगले काम होत नाही. आम्ही गेली पाच वर्षे बांधावर जाऊन शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे देखील ते म्हणाले. पुणे- नाशिक महामार्गालगत खेड बाह्यवळण घाटाच्या पायथ्याशी असलेल्या प्रशस्त जागेत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशस्त मंडप उभारण्यात येत असुन व्यासपीठ, कार्यकर्ते आणि श्रोते यांना मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 25 हजार श्रोते बसू शकतील, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आढळराव पाटील यांनी या वेळी दिली.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, तालुकाध्यक्ष राजूशेठ जवळेकर, अशोक भुजबळ, किरण आहेर, महेश शेवकरी, मारुती सातकर, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, निरीक्षक राजकुमार केंद्रे, संतोष घोलप आदी या वेळी उपस्थित होते.

शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ खेड-आळंदीत
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या राज्यातील 22 मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सत्तेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, महिला, युवकांसाठी जी धोरणे आखली त्याबाबत निर्णय घेतला, याची माहिती सभेत देणार आहेत. मुंबई, ठाणे वगळता इतर भागाच्या तुलनेत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सभांना गर्दी होत असते. त्यादृष्टीने मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाचा शुभारंभ करताना खेड तालुका निवडला आहे, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button