पंगतीमधून ये-जा करण्यास मनाई केल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा | पुढारी

पंगतीमधून ये-जा करण्यास मनाई केल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा

पिंपरी : जेवणाच्या पंगतीमधून ये-जा करण्यास मनाई केल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून हळदीच्या कार्यक्रमात राडा घातला. तसेच, एकावर कोयत्याने वार करत दहशत पसरवली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री जय भवानी चौक, श्रीनगर रहाटणी येथे घडली.
विजय राहुल तलवारे (22, रा. काळेवाडी) सनी राजीव गायकवाड (23,रा. पिंपरी), अनिकेत बापू बनसोडे (24, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहित प्रकाश गायकवाड (29, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित गायकवाड यांचा शुक्रवारी सायंकाळी हळदी समारंभ होता. दरम्यान, हळदी समारंभ झाल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करत होते. त्यावेळी आरोपी पंगतीमधून सतत ये-जा करीत होते. त्यामुळे रोहित यांनी त्यांना पंगतीमधून ये-जा करण्यास मनाई केली. याचा राग आल्याने आरोपींनी सुरुवातीला रोहित यांच्याशी बाचाबाची केली. त्यानंतर काही वेळाने आरोपी कोयता आणि रॉड घेऊन तेथे आले.

हवेत रॉड फिरवून केली दहशत
आरोपी विजय तलवारे याने रोहित यांचा मामे भाऊ शक्ती बनसोडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित यांनी शक्ती यांना ढकलले. कोयत्याचा वार रोहित यांच्या हातावर झाला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर आरोपींनी कोयता आणि रॉड हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट काढीन, अशी धमकी देत दहशत निर्माण केली. वाकड पािेलस तपास करीत आहेत.

 

Back to top button