Crime news : सायबर सेलची भीती दाखवून फसवणूक | पुढारी

Crime news : सायबर सेलची भीती दाखवून फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई सायबर क्राईम सेलमधून बोलत असल्याचे सांगून मेडिकल ऑफिसर तरुणीला भीती घालत 98 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणार्‍या तरुणीने फिर्याद दिली आहे. तरुणी वाकड येथील एका खासगी रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी करते. ती सध्या पब्लिक हेल्थचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही घेते. तिला 20 जुलै रोजी मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. तिला तिचे फेडेक्सचे आंतरराष्ट्रीय पार्सल हे मुंबई एअरपोर्ट वरून रिजेक्ट झाले असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी मोबाईलवरील व्यक्तीने त्या पार्सलमध्ये आठ आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, पाच एफडीआय क्रेडिट कार्ड, 250 ग्राम एमडीएम हा अमली पदार्थ, लॅपटॉप, पाच किलो कपडे असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, फिर्यादीने मी असे कोणतेही पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोबाईलवरील व्यक्तीने तिला तिचा आधार नंबर सांगितला. तसेच तुमच्या आधारचा वापर करून कुणीतरी पार्सल पाठवत असल्याचे सांगून तुम्ही मुंबई सायबर सेलकडे तक्रार करा, असाही सल्ला तिला दिला. मोबाईलवरील व्यक्तीने कॉल मुंबई सायबर सेलला कनेक्ट करण्याचा बनाव करून तिला सायबर सेलमधून बोलत असल्याचे भासवले. नंतर तिला तुमच्या आधारचा वापर करून कोणीतरी मनी लॉण्ड्रींग करत आहे असे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर सेलमधीलच वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून तिला आरबीआय नावाने एक पत्र पाठविले. तसेच या पत्राबाबत कोठेही वाच्यता न करण्यास सांगून तिला केसमधून बाहेर पडायचे असेल, तर तिला 98 हजार 726 द्यावे लागतील म्हटले. तरुणीनेही भीतीपोटी पैसे पाठविले. पैसे पाठविल्यानंतर संबंधित फोनवरील व्यक्तीने ज्या टेलिग्राम आयडीवरून तो बोलत होता तो आयडी डिलीट करून टाकल्याचे तरुणीच्या लक्षात आले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बांधकामाच्या साइटवर नेऊन विनयभंग
महाविद्यालयीन तरुणीला बांधकामाच्या साइटवर नेत विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देणार्‍या एकाला सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वैभव तुकाराम कर्णिक (20) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 18 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबरदरम्यान घडला. आरोपीने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिला नर्‍हे येथील एका कॉलेजच्या जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या साइटवर नेले. तेथे त्याने तिच्याबरोबर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. तिने त्याच्या कृत्याला विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाण करत तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकण्याची आरोपीने धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुलीचा छळ करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीला घरी सांभाळण्यासाठी घेऊन आलेल्या भावाच्या पत्नीने 9 वर्षांच्या या मुलीला नग्न करून तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वहिनीवर आंध प्रदेशातील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरदरम्यान मुलीचा भाऊ कामावर गेल्यावर त्याच्या पत्नीने हा घृणास्पद प्रकार केला. मुलीला नग्न करून तिला मारहाण करून चित्रीकरण केल्यावर तिने याबाबत कोठे वाच्यता न करण्याचीही धमकी देत होती. दरम्यान, पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर आंध— प्रदेशात मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दखल घेत गुन्हा विमानतळ पोलिसांकडे वर्ग केला असून, पुढील तपास विमानतळ पोलिस करीत आहेत.

शरीरसुखाची मागणी करणार्‍यावर गुन्हा दाखल
‘लॉजवर भेटायला नाही आलीस, तर तुझ्या कुटुंबीयांना जिवे मारीन,’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्रीनाथ भालचंद्र खानापुरे (रा. नवा मोंडा मार्केट, परभणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान घडला. आरोपीने वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. ‘तू मला बाहेर भेट व माझ्याबरोबर लॉजवर भेटायला चल, तू मला खूप आवडतेस, मी तुला खूप सुखात ठेवीन, तू माझी इच्छा पूर्ण कर,’ असे म्हणत ‘भेटायला नाही आलीस, तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकेन,’ अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button