Pune Crime Pune : दुचाकी अन् महिलेच्या मर्डर मिस्ट्रीचा छडा ! | पुढारी

Pune Crime Pune : दुचाकी अन् महिलेच्या मर्डर मिस्ट्रीचा छडा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकात झालेल्या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना एक दुचाकी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या मर्डर मिस्ट्रीचा छडा पोलिसानी लावला आहे. दरम्यान, खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नसून, ती मूळची गंगाखेड येथील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, रविसिंग राजकुमार चितोडिया (वय 29, रा. येवलेवाडी, मूळ रा. नाशिक), विजय मारुती पाटील (वय 32, रा. भोईसर पूर्व, ता. जि. पालघर) या दोघांना अटक केली आहे. शरीरसंबंधास नकार दिल्याच्या कारणातून संबंधित महिलेचा खून केल्याची दोघांनी पोलिसांकडे कबुली दिली आहे.

9 डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास एका पालात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात वार करून तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले. याप्रकरणी, बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नव्हती. घटनास्थळी कोणते पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर खुन्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करत असताना, एक दुचाकी त्या परिसरात मिळून आली. मात्र, तिचा नंबर दिसून येत नव्हता.

पुढे काही अंतरावर तीच दुचाकी एका चहाच्या हॉटेलजवळ दिसली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे तिचा संपर्क क्रमांक मिळवला. त्या वेळी ती कामशेत येथून चोरल्याचे दिसून आले. ती दुचाकी चितोडियाने चोरली होती. पुढे तीच दुचाकी पोलिसांच्या तपासाचा मोठा धागा ठरली. पोलिसांनी त्यासाठी गंगाधाम चौकापासून चाकणपर्यंतचे तब्बल अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांना चाकणमध्ये चितोडीयाच्या संदर्भात माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत तेथून तो पसार झाला होता. बातमीदारामार्फत चितोडिया नाशिक येथे गेल्याचे पोलिसांना समजले. पथकाने नाशिक येथून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने विजय पाटील याच्यासोबत मिळून महिलेचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर विजय पाटील याला पालघर येथून अटक करण्यात आली. मोबाईल, सीसीटीव्ही आणि दुचाकीमुळे पोलिसांनी अनोळखी महिलेच्या मर्डर मिस्ट्रीचा छडा लावला आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम बिबवेवाडी पोलिस करीत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लाहोटे, चैत्राली गपाट, कर्मचारी आश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, अमित कांबळे, राहुल ढमढेरे यांच्या पथकाने केली.

असा केला महिलेचा खून

गंगाधाम चौकात आयुर्वेदिक औषधांची विक्री करणार्‍या एका व्यक्तीचे पाल आहे. खून झालेली महिला रात्री तेथे झोपण्यास येत होती. तर आरोपी चितोडिया आणि पाटील हे दोघेदेखील तेथे झोपण्यास आले होते. दोघांना दारूचे व्यसन आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री एक वाजता चितोडिया आणि पाटील पालावर झोपण्यासाठी आले. त्यांनी महिलेला उठवून शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, महिलेने त्याला विरोध केला. त्यानंतर दोघांनी महिलेसोबत झटापट केली. पाटील याने महिलेला खाली पाडले. त्यानंतर चितोडिया याने पालात पडलेला हातोडा उचलून महिलेच्या डोक्यात मारला. सकाळी पोलिसांना त्या महिलेचा मृतदेह मिळून आला.

आरोपींनी महिलेचा खून केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. तसेच महिलेची
ओळखदेखील पटलेली नव्हती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, दुचाकी आणि मोबाईलचे
विश्लेषण करून या दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या.

– महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

हेही वाचा

Back to top button