सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटता सुटेना ! टँकरमाफियांची चांदी | पुढारी

सोसायट्यांचा पाणी प्रश्न सुटता सुटेना ! टँकरमाफियांची चांदी

दीपेश सुराणा

पिंपरी : शहरातील काही भागांतील सोसायट्यांमध्ये सध्या टँकरच्या फेर्‍या सुरू झाल्या आहेत. या सोसायट्यांना दिवसाला 1 ते 2 टँकर पाणी मागवावे लागत आहे. तर, काही मोठ्या सोसायट्यांची तहान भागत नसल्याने त्यांना दिवसाला चक्क 10 टँकर इतके पाणी मागवावे लागत आहे. जानेवारी महिन्यापासून टँकरची मागणीही वाढेल आणि फेर्‍याही वाढतील, असे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे टँकरमाफियांची मात्र चांगलीच चांदी होणार आहे.

सीव्हेज ट्रीटमेंट प्लान्ट असणार्‍यांना कमी पाणी
ज्या सोसायट्यांनी पाण्याच्या पुनर्वापरासाठी सीव्हेज ट्रीटमेंट प्लॉन्ट (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) उभारले आहेत, त्यांना महापालिकेकडून प्रति व्यक्ती केवळ 90 लिटर इतके पाणी दिले जात आहे. मूळ निकषानुसार प्रति व्यक्ती 135 लिटर इतके पाणी देणे अपेक्षित आहे. ज्या सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे, त्या सोसायट्यांनी प्रतिव्यक्ती 90 लीटरशिवाय उर्वरित 45 लीटर पाण्याची गरज या केंद्राच्या माध्यमातून भागविणे गरजेचे आहे, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोठ्या सोसायट्यांचा टँकरवर लाखोंचा खर्च
शहरातील काही मोठ्या सोसायट्यांना टँकरवर दरमहा लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. चिखलीतील एका सोसायटीला सध्या दिवसाला 10 टँकर लागत आहेत. या सोसायटीमध्ये सीव्हेज ट्रीटमेंट प्लॉन्ट असल्याने महापालिकेकडून तेथे प्रति माणसी 90 लिटर इतकेच पाणी दिले जात आहे. ही सोसायटी मोठी असून त्यांना त्यामुळे पाण्याची अडचण जाणवत आहे.

छोट्या सोसायट्यांचा खर्च कमी
शहरातील काही छोट्या सोसायट्यांमध्ये सध्या दिवसाला 2 टँकर याप्रमाणे महिन्याला किमान 60 टँकर इतके पाणी लागत आहे. प्रत्येक टँकर पाण्यासाठी सरासरी एक हजार ते 1 हजार 200 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार 2 टँकर मागविणार्या सोसायटीला दरमहा 60 ते 66 हजार रुपये इतका खर्च येत आहे.

पाण्याबाबतच्या तक्रार निवारणासाठी दरमहा बैठक
पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायटीधारकांना जाणवणार्या पाणी समस्येबाबत बैठक झाली. या बैठकीत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयी चर्चा झाली. तसेच, पाण्याबाबतच्या तक्रार निवारणासाठी दरमहा बैठक घेण्याचे ठरले आहे.

कोणत्या भागात जाणवते टंचाई ?
शहरातील सर्वच भागातील सोसायट्यांना पाण्याची टंचाई जाणवत असली तरीही मुख्यत्वे चिखली, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रावेत, पुनावळे, मोशी आदी भागातील सोसायट्यांना या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते.

शहरातील काही सोसायट्यांना सध्या दिवसाला 1 ते 2 टँकर इतके पाणी लागत आहे. जानेवारी महिन्यापासून टँकरची मागणी व फेर्‍या वाढतील. उन्हाळ्याच्या कालावधीत सोसायट्यांना 5 ते 15 टँकरपर्यंत पाणी लागते. ज्या सोसायट्यांना दिवसाला 5 टँकर लागतात त्यांना दरमहा दीड लाख रुपये इतका खर्च येतो. महापालिकेकडे पाणी नाही तर टँकरवाले पाणी कोठून आणतात? टँकरचालक ज्या विहिरींतून पाणी आणतात त्या विहिरी महापालिकेने ताब्यात घेऊन सोसायट्यांना पाणी द्यावे.
       – दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

 

शहरातील ज्या सोसायट्यांनी एसटी प्लॉन्ट बसविले आहेत त्यांना प्रतिमाणशी 90 लिटर इतके पाणी दिले जात आहे. एसटी प्लॉन्ट असणार्या सोसायट्यांनी त्यांची पाण्याची प्रति व्यक्ती असणारी आणखी 45 लिटरची गरज पाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर करुन भागवावी. शहरासाठी आंद्रा धरणातुन सध्या आपण 75 दशलक्ष लिटरइतके अधिकचे पाणी उचलत आहोत. भामा आसखेड धरणातुन पाणी आणण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सोसायट्यांना महापालिकेकडून पाणी कमी सोडले जात नाही. त्यांनीच त्याचा वापर मर्यादित ठेवायला हवा.
                                            – श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता-1, महापालिका.

 

Back to top button