कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत माउलींचा जयघोष | पुढारी

कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत माउलींचा जयघोष

आळंदी : पुढारी वृत्तसेवा  : कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी एकादशीची पहाटपूजा शनिवारी (दि. 9) पहाटे एक वाजता समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती करीत 11 ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात झाली. यंदा माउलींच्या पहाटपूजेचा मान हा सन 2021 मध्ये मानकरी ठरलेल्या आडे दाम्पत्याला पुन्हा एकदा मिळाला. पहाटपूजेसाठी दर्शनबारी बंद केल्यानंतर दर्शनबारीत असणार्‍या पहिल्या वारकरी दाम्पत्याला हा मान दिला जातो. आडे दाम्पत्य हे दुसर्‍यांदा मानकरी ठरले. त्यांच्यावर माउलीकृपा झाली, अशी भावना त्यांच्यासह सर्व वारकर्‍यांमध्ये होती.

शेतकरी असलेले आडे दाम्पत्य जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी गावचे आहेत. शेषराव सोपान आडे (वय 60) आणि गंगूबाई शेषराव आडे (वय 55) असे या दाम्पत्याचे नाव आहे. आडे दाम्पत्य गेल्या 30 वर्षांपासून आळंदीची वारी करत आहेत. रात्री साडेबारा वाजता समाधी दर्शन बंद करण्यात आले. तद्नंतर संपूर्ण मंदिर स्वच्छ करण्यात आले. बारा वाजता पास धारकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. स्वकाम सेवा मंडळ, फिनिक्स सर्व्हिसेस व इतर स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मंदिरात स्वच्छता करण्यात आली. रात्री पाऊण वाजता मुख्य महापूजा व पवमान अभिषेकास सुरुवात झाली.

माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम—खंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर चंदेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. 11 ब्रह्मवृंदाच्या वतीने रुद्राभिषेक करण्यात आला. दीड वाजता अभिषेक उरकल्यानंतर पूजेचा मान लाभलेल्या आडे दाम्पत्याला दर्शनाचा मान देण्यात आला. पावणेदोन वाजता धुपारती होऊन समाधीचे दर्शन खुले करण्यात आले.

या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, ह.भ.प. भावार्थ देखणे, योगी निरंजननाथजी, अ‍ॅड. राजेश उमाप यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळ-प्रसाद देण्यात आला. या वेळी प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माउलींचे मानकरी योगीराज कुर्‍हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुर्‍हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्य महाराज लोंढे, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुर्‍हाडे, प्रदीप बवले, रोहन कुर्‍हाडे तसेच प्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button