उजनीत दैनंदिन 25 टन लहान माशांची कत्तल ; जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत धक्कादायक बाब उघड | पुढारी

उजनीत दैनंदिन 25 टन लहान माशांची कत्तल ; जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत धक्कादायक बाब उघड

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  उजनीत दैनंदिन 25 टन लहान माशांची कत्तल व तस्करी, तर भारतात प्रतिबंधित मांगूर माशांचे वर्षाला दहा हजार टन संगोपन सुरू असल्याची धक्कादायक बाब जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उघड झाली आहे. या कृत्यामुळे धरणातील मत्स्यसंपदा व जैविक साखळी निखळून पडली आहे. यावरून आता जलसंपदा, मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिस, महसूल, प्रदूषण मंडळ एकत्रितपणे येऊन उजनीत बेकायदा चालणारी लहान मासेमारी व मांगूर संगोपनाचा येत्या आठवड्यात बीमोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या :

हा बीमोड करण्यासाठी अवघ्या आठवड्यात अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या आहेत. या बैठकीस जिल्हाधिकारी मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे पोपटराव मोरे, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उपविभागीय पोलिस अधिकारी युवराज मोहिते, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, दौंडचे नायब तहसीलदार शरद भोंग तसेच गिरीश जोग, नंदकुमार नगरे, नितीन खाडे, किरण वाघमारे, भीमाशंकर पाटील, दीपाली गुंड आदी उपस्थित होते.

उजनीत येत्या आठवड्यात पहिल्यांदाच शासनाच्या वतीने पावणेदोन कोटी खर्च करून एक कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 28) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये धरणात सोडण्यात येणारे मत्स्यबीज संगोपन महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

उजनीत लहान जाळ्याच्या साहाय्याने होणारी मासेमारीचे रॅकेट मोठे असल्याने मत्स्यसंपदा व जैविक साखळी धोक्यात आल्याने लहान मासे मारण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सर्वच प्रकारच्या लहान आकाराच्या जाळी वापरण्यावर बंदीचा व पर्यायाने कायदेशीर कडक कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. लहान मासे मारून किनार्‍यावर सुकवणे व विक्री केल्यास तसेच लहान ओले मासे पकडणे विक्री करण्यावर बंदी घालणे व पर्यायाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असलेला व संपूर्ण भारत देशात बंदी असलेल्या मांगूर माशांची बेकायदेशीर शेती करणारा उजनीचा काठ महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. विशेष म्हणजे या मांगूर माशांचे संगोपन हे सर्वाधिक उजनीच्या संपादित जागेत केले जात असल्याचा धक्कादायक वास्तव उघडकीस आला आहे. त्यामुळे मांगूर शेती करणार्‍या सर्वांची कुंडली जमा करून विभागवार कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये तहसीलदार श्रीकांत पाटील व किरण वाघमारे यांनी प्रभावी मत व्यक्त केले.

महिन्यात सर्व बंद करतो : तहसीलदार पाटील
या बैठकीत इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उजनीतील लहान मासे, मांगूर पालन या बेकायदेशीर बाबींवर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. यामध्ये वाळूप्रमाणेच अवैध मासेमारीत गँगवर तयार झाल्याचे व गुंडांची दहशत पसरल्याचे सांगितले. पाटील हे वाळूमाफियांचे कर्दनकाळ म्हणून जिल्ह्यात परिचित असल्याने वाळूचा कण चोरण्यासाठी कोणी धजावत नाही. त्यामुळे धरणात लहान मासेमारी व मांगूरबाबत संयुक्त कारवाई सुरू करा, मी महिन्यात सर्व बंद करतो, अशी डरकाळी त्यांनी या वेळी फोडली.

Back to top button