Pune News : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान | पुढारी

Pune News : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान

पुणे : राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, या आपत्तीत 161 जनावरे दगावली आहेत. अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 29) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मदतीबाबत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हानिहाय झालेल्या पीक नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : ठाणे 53, पालघर 548, नाशिक 32 हजार 833, धुळे 234, नंदुरबार 2 हजार 783, जळगाव 905, अहमदनगर 15 हजार 307, पुणे 3 हजार 500, सातारा 15, छत्रपती संभाजीनगर 4 हजार 200, जालना 5 हजार 279, बीड 215, हिंगोली 100, परभणी 1 हजार, नांदेड 50 आणि बुलडाणा 63 हजार 250 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

कॅबिनेटमध्ये आज चर्चा होणार

मुंबईत मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. 29) बैठक होत आहे. या बैठकीत राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांच्या व फळबागांच्या झालेल्या नुकसानीबाबतच्या कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तथा एनडीआरएफच्या निकषांनुसार देण्यात येणार्‍या केंद्राच्या आर्थिक मदतीव्यतिरिक्त राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी कोणता निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे राहील, अशीही माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल विभागाच्या वतीने नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सरकारची भूमिका आहे.

– धनंजय मुंडे, कृषिमंत्री

हेही वाचा

अवकाळी पाऊस : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान

शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नाही; शिंदे गटाची भूमिका

Uttarakhand Tunnel Rescue : अजस्र यंत्रे हरली; पण जिंकले मजुरांचे हात!

 

Back to top button