शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नाही; शिंदे गटाची भूमिका | पुढारी

शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पद नाही; शिंदे गटाची भूमिका

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखाचा उल्लेख नाही. तसेच, उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते आणि मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा नवा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच बनावट असल्याच्या दाव्याचा पुनरूच्चार शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी मंगळवारी केला. शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी बनावट ठराव आणि आमदारांच्या खोट्या सह्यांचा आरोप लावून धरला. तर, ठाकरे गटाने हे दावे साफ खोटे असल्याचे सांगत सर्व माहिती रेकॉर्डवर दिल्याचे उत्तर कायम ठेवले.

शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. 21 जून 2022 रोजी झालेल्या या ठरावावर शिंदे गटाच्या वकिलांनी मंगळवारी, चौथ्या दिवशी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली.

जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. कोणत्या आधारावर हा ठराव केला, असा प्रश्न करतानाच हा ठरावच बनावट असून त्यावरील सह्याही खोट्या असल्याचे सांगत प्रश्नांची सरबत्ती केली. या ठरावाला आमदार दिलीप लांडे यांनी अनुमोदन दिलेले नाही. त्यामुळे झालेला ठराव खोटा आहे आणि दिलीप लांडे यांची कथित ठरावावरील सही आणि त्या दिवशीच्या हजेरीपटावरील सही पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा जेठमलानी यांच्याकडून करण्यात आला. यावर हे खोटे असल्याचे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले. याबाबतचा युक्तिवाद पटलावर नोंदविण्यात आला.

शिवाय, प्रतिज्ञापत्राच्या पहिल्याच ओळीत पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला, असे प्रश्न वकिलांनी केले. त्यावर, प्रभू यांनी तशा बातम्या टीव्हीवर येत होत्या, असे सांगितले. त्यावर, खातरजमा न केलेल्या बातम्यांच्या आधारावर आमदारांना बैठकीच्या नोटीस काढण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला. यावर सुरतला गेलेल्या आमदारांकडून आपल्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचा दावा करण्यात आल्याने सरकार अस्थिर होईल, या शक्यतेने नोटीसा काढण्यात आल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीयशक्ती या शब्दाचे भाषांतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘नॅशनल पॉवर’ असे केले. त्यावर महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना ‘नॅशनल’ की ‘अँटी नॅशनल’ असा खोचक सवाल केला. त्यावर प्रभू यांनी लागलीच ‘मी नॅशनल’ असे उत्तर दिले.

प्रतोदचा निर्णय पक्षप्रमुखांचा : सुनील प्रभू

यावेळी प्रतोद पदावरूनही साक्ष झाली. याबाबतच्या प्रश्नावर मुख्य प्रतोद म्हणून 31 आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागूच होऊ शकत नाही, असा दावा जेठमलानी यांनी केला. त्यावर, प्रभू यांनी अत्यंत शांतपणे मुख्य प्रतोदपदावरून मला हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही, असे उत्तर दिले. माझी नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली आहे. पदावरून काढण्याचेही अधिकारही पक्षप्रमुखांचे असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

Back to top button