अवकाळी पाऊस : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान | पुढारी

अवकाळी पाऊस : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, या आपत्तीत 161 जनावरे दगावली आहेत. अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 29) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मदतीबाबत सरकार कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

16 जिल्ह्यांना फटका

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत सुमारे 16 जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. त्याचा फटका रब्बी हंगामातील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेले भात, ज्वारी, गहू, हरभर्‍यासह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला असून, तेथे 53 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, डहाणू तालुक्यांतील 41 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड आणि येवला तालुक्यांतील 23 हजार 833 हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस आणि फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यांतील 46 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, कापूस, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यांतील 2 हजार 239 हेक्टरवरील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड आणि भडगाव तालुक्यांतील 552 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता तालुक्यातील 15 हजार 307 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाने दिली आहे.

पंचनामे केलेले प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार 99 हजार 381 हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.

Back to top button