मद्यपानाकडे वळताहेत तरुणाईची पावले | पुढारी

मद्यपानाकडे वळताहेत तरुणाईची पावले

दीपेश सुराणा

पिंपरी : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात मद्यपानाकडे वळू लागली आहे. करिअरच्या टर्निंग पाँइंटवर अभ्यास आणि पुढच्या भविष्याचे नियोजन करण्यासाठी वेळ देण्यापेक्षा मद्यपान करण्यात तरुणांचा वेळ वाया जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील तरुणांमध्ये मद्यपानाचे सेवन करण्याचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आढळत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले. ही त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

तरुणाईकडून रात्री-अपरात्री मित्र-मैत्रिणींबरोबर करण्यात येणार्‍या पार्ट्या, उच्चभ्रू वसाहतींमध्ये होणार्‍या पार्ट्यांमध्ये सहजपणे होणारी मद्याची देवाणघेवाण, बदलत्या जीवनशैलीमुळे सुरुवातीला स्टेटस सिम्बॉल म्हणून मित्रांसोबत काही छोटे दारुचे पेग घेणारे तरुण हळूहळू मद्यपानाच्या व्यसनाकडे ओढले जातात. पिंपरी-चिंचवडमधील तरुणांमध्ये मद्यपानाचे सेवन करण्याचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आढळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सध्या बदलत्या परिस्थितीत 15 ते 20 वयोगटातील तरुण देखील मद्यपान करताना आढळू लागले आहेत.

मद्यपानाच्या आहारी जाण्याची कारणे
तरुणांमध्ये होणार्‍या हार्मोनल चेंजेसमुळे ते अशा व्यसनांकडे ओढले जातात. कुटुंबात कोणाला व्यसन असेल तर मुलांनाही दारुचे व्यसन लागू शकते. आजूबाजूची परिस्थिती, ताणतणाव, नातेसंबंधांतील वितुष्ट किंवा तणाव देखील त्यासाठी कारणीभूत ठरतात.

आरोग्यावरील दुष्परिणाम
मद्यपान हे शरीरातील विविध आजारांना कारणीभुत ठरु शकते. यकृत, मेंदुचे विकार, ह्दयविकार त्यामुळे होऊ शकतात. त्याशिवाय, विविध मानसिक आजारही होतात.

हृदयावर होणारे परिणाम
मद्यपानामुळे ह्दयाची पंपींग करण्याची क्षमता कमी होते. ह्दयाचे ठोके अनियमित पडू लागतात. रक्तातील चरबी वाढते. त्याचप्रमाणे, अति मद्यपानामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील ओढवू शकतो, अशी माहिती कार्डियोलॉजिस्ट डॉ. गौतम जुगल यांनी दिली.

कोणते उपचार केले जातात ?
मद्यपानाचे व्यसन जडलेल्या तरुणांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जातात. हे व्यसन प्राथमिक स्तरावर असेल तर बाह्यरुग्ण विभागातही उपचार शक्य आहेत. औषधोपचार, समुपदेशन, जीवनशैलीत बदल करणे आदी माध्यमातून हे उपचार केले जातात, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. धनजंय अष्टुरकर यांनी दिली.

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये सध्या मद्यपानाचे प्रमाण वाढू लागले आहे. ही धोक्याची घंटा आहे. सुमारे 15 टक्के तरुण मद्यपान करीत असल्याचे निरीक्षण आहे. सध्या बदलत्या परिस्थितीत 15 ते 20 वयोगटातील तरुण देखील मद्यपान करताना आढळू लागले आहेत.
                                              – डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ.

अति मद्यपानामुळे अल्कोहोलिक कार्डियोमायोपॅथीचा आजार निर्माण होतो. ह्दयाचे मसल कमकुवत होतात. यकृत खराब होते. रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते, त्यामुळे हार्टअटॅक देखील येऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेता मद्यपान टाळणे गरजेचे आहे.
                                    – डॉ. प्रणव देशमुख-शेंडे, कार्डियोलॉजिस्ट.

Back to top button