Pune : ऊसदर परिषदेत ’माळेगाव’,’सोमेश्वर’चे कौतुक | पुढारी

Pune : ऊसदर परिषदेत ’माळेगाव’,’सोमेश्वर’चे कौतुक

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित 22 व्या ऊसदर परिषदेत संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी दिलेल्या ऊसदराचे कौतुक करत या ऊसदराप्रमाणे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांनी ऊसदर देण्याची मागणी केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व माळेगाव साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण पाटील यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिली.

कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे,उपाध्यक्ष तानाजी देवकाते,माजी उपाध्यक्ष सागर जाधव,कार्यकारी संचालक अशोक पाटील यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक मदन देवकाते, सुरेश खलाटे, नितीन सातव, तानाजी कोकरे, अनिल तावरे, स्वप्निल जगताप, प्रताप आटोळे, मंगेश जगताप, पंकज भोसले, सुरेश देवकाते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास सस्ते, कल्याण भगत, सुखदेव जाधव आदी उपस्थित होते.

ढवाण पाटील म्हणाले, माळेगाव साखर कारखाना राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. कारखान्याने गाळप हंगाम सन 2022-23 मधील तुटून आलेल्या उसाचा सरासरी साखरउतारा 11.81 असताना प्रतीटन 3 हजार 411 रुपये ऊसदर दिला आहे. हाच धागा पकडत जयसिंगपूर येथील ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अजित पवार यांचे नाव घेत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव घेऊन अजित पवारांच्या अधिपत्याखाली असलेल्या माळेगाव साखर कारखान्याने सरासरी 11.81 साखरउतारा असताना 3 हजार 411 रुपये प्रतीटन भाव दिला आहे. आपणदेखील कोल्हापूरसह सर्वच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी माळेगावप्रमाणे ऊसदर देण्याची मागणी केली असल्याची माहिती ढवाण पाटील यांनी दिली.

तर माळेगाव साखर कारखान्यात संचालक म्हणून काम करत असताना शेतकरी हिताचेच निर्णय घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. या वेळी कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेल्या कौतुकाचा स्वीकार करून यापुढेदेखील कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. केशवबापू जगताप तसेच माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक मंडळाच्या सहकार्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना अधिकचा भाव देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.

हेही वाचा : 

Back to top button