solar energy : ’सौर’ विजेची भरारी 501 मेगावॉटवर | पुढारी

solar energy : ’सौर’ विजेची भरारी 501 मेगावॉटवर

शिवाजी शिंदे

पुणे : पश्चिम महाराष्ट्रामध्ये छतावरील सौरऊर्जानिर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 24 हजार 387 सौरऊर्जा प्रकल्पांमधून वीजनिर्मितीची 501 मेगा वॉट क्षमता निर्माण झाली आहे. यामध्ये अनुदान मिळालेल्या 3 हजार 885 घरगुती व सोसायट्यांनी
17 मेगावॉटचे, तर बिगर अनुदानामध्ये 29 हजार 502 घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांनी 484 मेगावॉट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.

उद्दिष्ट पूर्ण

सौर ऊर्जा निर्मितीच्या विविध योजनांना चालना मिळाली आहे. याची फलनिष्पत्ती म्हणजे केंद्र शासनाने 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी घरगुती ग्राहकांसाठी राज्याला 100 मेगावॉटचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले आहे.

विजबिलात सवलत

छतावरील सौरऊर्जानिर्मिती योजनेमध्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे 25 वर्ष लाभ होतो. सोबतच सौर प्रकल्पाच्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून संबंधित ग्राहकाच्या वीजबिलात समायोजित केली जाते.

घरगुती वीजग्राहकांचा प्रतिसाद

घरगुती वीजग्राहकांना अनुदान जाहीर झाल्यानंतर या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या दीड वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 3 हजार 885 घरगुती ग्राहकांनी छतावर तब्बल 17.04 मेगावॉट (17 हजार 47 किलोवॉट) क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॉटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॉटपेक्षा अधिक ते 10 किलोवॉटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॉटपर्यंत; परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (निवासी कल्याणकारी संघटना) ग्राहकांना 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे.

पाच जिल्ह्यांत अधिक प्रकल्प

छतावर सौर पॅनेल्सद्वारे वीजनिर्मितीमध्ये आतापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 876 ग्राहकांनी 316.2 मेगावॉट, सातारा जिल्हा – 1944 ग्राहकांनी 39.9 मेगावॉट, सोलापूर- 3394 ग्राहकांनी 51.2, कोल्हापूर- 4002 ग्राहकांनी 63.3 मेगावॉट आणि सांगली जिल्ह्यातील 2171 ग्राहकांनी 30.2 मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प छतावर कार्यान्वित केले आहेत. सद्यस्थितीत या पाचही जिल्ह्यांमध्ये 144 ठिकाणी 1.9 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून 1941 ठिकाणी 31.4 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यतेची तपासणी सुरू आहे.

हेही वाचा

World Cup 2023 : सचिनच्या विक्रमाला ‘नोटीस’

नागपूर : मोबाईल न दिल्याने मुलाने केली आईची हत्या

Back to top button