World Cup 2023 : सचिनच्या विक्रमाला ‘नोटीस’ | पुढारी

World Cup 2023 : सचिनच्या विक्रमाला ‘नोटीस’

 

निमिष पाटगावकर

क्रिकेटमध्ये विक्रम हे मोडण्यासाठीच केलेले असतात, पण काही विक्रम असे असतात जे कधी कुणी मोडेल असे वाटत नाही. सर डॉन ब्रॅडमन मन यांचा 29 कसोटी शतकांचा विक्रम जेव्हा सुनील गावस्करांनी मोडला आणि एकूण 34 कसोटी शतके ठोकली तेव्हा वाटले होते हा विक्रम अबाधित राहील. द्रविड, संगकारा, पाँटिंग, कॅलिस यांनी 34 चा आकडा ओलांडला, पण तेंडुलकर 51 शतके करून थांबला. तसेच एक दिवसीय सामन्यात 49 शतके करून तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय शतकांची शंभरी केली. हा विक्रम कोणी मोडेल असे वाटत नसताना विराट कोहलीने पुण्याला आपले एक दिवसीय सामन्यातील 48 वे शतक करत तेंडुलकरच्या एक दिवसीय शतकांच्या विक्रमाला तरी मोडीत काढण्याची नोटीस काढली आहे.

भारत बांगला देश विरुद्ध सहज जिंकत असताना जिंकायला हव्या असलेल्या उरलेल्या धावा काढून कोहलीने आपले शतक पूर्ण केले म्हणून काहींनी नापसंतीही दर्शवली. वैयक्तिक विक्रमापेक्षा संघ मोठा, देश मोठा हे न समजायला कोहली काही नवशिका नाही. चेन्नईला विश्वचषकाचा पहिला सामना जिंकून देताना तो पंड्याला सांगून शतकाच्या मागे गेला नाही तर सामना पहिला खिशात टाकायला प्राधान्य दिले. जिंकायला आणि कोहलीच्या शतकाला 19 धावा असताना कोहलीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला एकेरी धावा नाकारणे चांगले दिसणार नाही हे समोरच्या राहुलला सांगितले होते, पण राहुलनेच त्याला शतक पूर्ण करायला प्रोत्साहन दिले. कारण आपण सहज जिंकत होतो. विश्वचषकात नेट रनरेटला महत्त्व असले तरी कोहलीने शतकासाठी विजय काही चेंडू लांबवल्याने नेट रनरेटमध्ये काही शतांशाचा फरक पडला असेल. आज भारत-न्यूझीलंड गुणसंख्या आणि रनरेट दोन्हीत बाकीच्या संघांपेक्षा खूप पुढे आहेत तेव्हा त्याची चिंता नको.
क्रिकेटमध्ये अशी उदाहरणे नवीन नाहीत. 1999 च्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत पहिला चेन्नईचा कसोटी सामना चुटपूट लागेल असा फक्त 12 धावांनी आपण हरल्यावर दिल्ली कसोटीत विजय मिळवणे अत्यावश्यक होते, पण विजयाची खात्री असल्यावर अनिल कुंबळेला आपला डावातील दहावा बळी मिळावा म्हणून पाकिस्तानची शेवटची जोडी खेळत असताना जवागल श्रीनाथने आपले पूर्ण षटक जवळपास वाईड होतील अशा चेंडूंचे टाकले जेणेकरून कुंबळेचा विक्र म होईल. वैयक्तिक कामगिरी ही खेळाडूचे मनोबल वाढवतेच आणि भारताच्या विश्वचषकातील पुढील वाटचालीसाठी कोहलीच्या या शतकाचे महत्त्व आहे.

कोहलीची मोठी खेळी म्हणजे शतक हे समीकरण आहे. कारण कोहलीचा डाव रोहित शर्मासारखा मुक्तछंदातील नसून पायाभरणी करून इमारत बांधणारा असतो. पहिल्या सामन्यातील सदोष इमारत आणि मग दोन अर्धवट बांधकामे झाल्यावर त्याला एक मोठी इमारत बांधणे जरुरीचे होते. कोहलीच्या 273 एक दिवसीय सामन्यांत त्याने या बिनशतकी खेळ्या केल्या आहेत त्यात 70 पेक्षा जास्त धावा फक्त 34 डावांत केल्या आहेत आणि त्यातील 6 वेळा तो नाबाद राहिला आहे. यावरून अर्धशतकातून शतकाकडे जायचे उत्तम प्रमाण दिसून येतेच, पण सेट झाल्यावर शतक झाले नाही तर एक फलंदाज म्हणून त्याची अस्वस्थता दिसून येते. ही अस्वस्थता संघासाठी चांगली असते. या शतकाने कोहलीला आपण फॉर्ममध्ये आहोत ही कोहलीची स्वतःची स्वतःला पावती आहे.

या विश्वचषकात आपण सलग चार विजय मिळवले असले तरी आपल्या धावा 201, 273, 192 आणि 261 अशा आहेत. अर्थात, या सगळ्या धावा आपण पाठलाग करताना केल्या आहेत. या विश्वचषकात अजून आपण टार्गेट सेट करून जिंकलेलो नाही. बाकीचे संघ जेव्हा सहज साडेतीनशे, वेळप्रसंगी चारशेही धावा काढत असताना आपल्याला अजून हे टार्गेट देणे तपासून बघायचे आहे. यासाठी भारताच्या टॉप ऑर्डरला आतापर्यंत मिळालेली छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपली मोठ्या सामन्याची तयारीही करायची आहे. रोहित शर्माने ती अफगाणिस्तानविरुद्ध केली आणि कोहलीने ती बांगला देशविरुद्ध केली. कालच्या वॉर्नर-मार्श जोडीने केलेली 259 धावांची भागी बघता साडेतीनशेचे लक्ष्य ठेवायला दोन तरी मोठ्या खेळीची आवश्यकता असते हे पुन्हा दिसून आले. आपल्या आतापर्यंतच्या चार सामन्यांत रोहित आणि कोहली यांच्याच मोठ्या खेळ्या झाल्या आहेत. शुभमन आणि श्रेयस चुकीच्या वेळी चुकीच्या फटक्यांनी बाद होत आहेत तेव्हा आता अपेक्षा आहे ती त्यांच्या मोठ्या खेळीची.

भारताची एकूण फलंदाजी आतापर्यंत समाधानकारक असली तरी थिंक टँकला आठवा फलंदाज शार्दूल ठाकूरच्या रूपाने हवाहवासा वाटतो. विश्वचषकात 2019 ला न्यूझीलंडविरुद्ध आपली फलंदाजी कोसळल्याचा धसका अजून आपण घेतला आहे की काय, असे या धोरणात दिसते. न्यूझीलंड, इंग्लड, द. आफि—का यांच्या फलंदाजीला रोखायचे असेल तर आपल्याला आठवा फलंदाज असण्यापेक्षा पाचवा गोलंदाज असणे जरुरीचे आहे. हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नाही तेव्हा या निमित्ताने का होईना शमी किंवा अश्विनची संघात वर्णी लागेल आणि गोलंदाजीच्या नव्या सूत्राची तपासणीही आपल्याला करता येईल.

Back to top button