Lalit Patil Drug Case : पालकमंत्र्यांकडून ससूनचे ‘पोस्टमार्टम’ | पुढारी

Lalit Patil Drug Case : पालकमंत्र्यांकडून ससूनचे 'पोस्टमार्टम'

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची झाडाझडती घेत ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीचेच पोस्टमार्टम केले. बैठकीमध्ये दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या वाचून दाखवत त्यांनी डॉ. ठाकूर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

ससून रुग्णालयातील ड्रग्जतस्कर ललित पाटील फरार झाला. त्यानंतर ससून रुग्णालयातील अनेक प्रकरणे समोर आली. यासंदर्भात दै. पुढारीने कैदी असलेले रुग्ण अनेक दिवस ससूनमध्ये पाहुणाचार घेत असल्याची बाब समोर आणली. त्यानंतर ससून प्रशासनाला उपरती झाली. नऊ पैकी पाच कैदी रुग्णांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबत पवार यांनी डॉ. ठाकूर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विविध विभागांतील योजना आणि इतर कामांचा आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.

आरोग्यविषयासाठी सकाळी 11 ते 12 पर्यंत अजित पवार यांनी वेळ दिली होती. पवार यांनी सर्वात आधी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्याकडे मोर्चा वळवत ड्रग्ज प्रकरणाकडे लक्ष वेधले. ससूनमध्ये घडलेल्या घटनेला कोण जबाबदार, असा सवाल केला. त्यावर डॉ. ठाकूर यांनी थातूरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर अजित पवारांनी दै.पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्याच वाचवून दाखवल्या. चालढकल चालणार नसून, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले.

डॉ. ठाकुरांनी घेतला काढता पाय

बैठक संपल्यानंतर माहिती द्या, अशी विनंती माध्यम प्रतिनिधींनी ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्याकडे केली. त्यानंतर ते बोलायला तयार झाले. डॉ. ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ससून रुग्णालयातील असलेल्या सुविधा, उपचार याची माहिती दिल्याचे सांगितले. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणाबाबात प्रश्न विचारताच त्यावर एकही शब्द न बोलता डॉ. ठाकूर गाडीत बसून निघून गेले.

हेही वाचा

Nashik News : विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भूमिका पुराव्यानिशी : खा. उदयनराजे

Pune Railway News : सणासुदीच्या काळात रेल्वेच्या विशेष फेर्‍या; पुण्यातून 28 फेर्‍या होणार

Back to top button