pimpri News : फायनान्स कंपन्यांचा कर्जदारांच्या नातेवाइकांसह शेजार्‍यांना त्रास ? | पुढारी

pimpri News : फायनान्स कंपन्यांचा कर्जदारांच्या नातेवाइकांसह शेजार्‍यांना त्रास ?

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी फायनान्स कंपन्यांचे वसुली पंटर कर्जदारांचे नातेवाईक आणि शेजार्‍यांना त्रास देऊ लागले आहेत. कागदोपत्री कोणतीही जबाबदारी (जामीनदार) घेतली नसतानाही एजंट अशा प्रकारे त्रास देऊ लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून याबाबतच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे. कर्जदार हप्ते भरत नसल्यास बँका ‘थर्ड पार्टी” असेलल्या एजन्सीकडे कर्ज वसुलीची जबाबदारी सोपवतात. संबंधित एजन्सीने नियमांच्या अधीन राहून कर्ज वसुली करणे अपेक्षित असते. मात्र, एजन्सीकडे असणारे वसुली एजंट कर्जदारांशी असभ्य वर्तन करतात. ज्यामुळे अनेकदा कर्जदार आणि वसुली करणार्‍या एजंटमध्ये वाद होत असल्याचे दिसून येते.
काही महिन्यांपासून वसुली करणार्‍या एजंटने कर्जदारावर दबाव टाकण्यासाठी बदनामीचे अस्र वापरण्यास सुरुवात केले आहे. वसुली एजंट कर्जदारांच्या परिसरातील नागरिकांसह नातेवाइकांचे संपर्क क्रमांक मिळवतात. त्यांना फोन करून कर्जदारास आपण ओळखता का, अशी विचारणा केली जाते. त्यानंतर त्यांना हप्ते भरण्यास सांगा, असे असा सज्जड दम दिला जातो. यावर नातेवाईक किंवा शेजारी आपल्याला कर्जाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगतात.
मात्र, तरीदेखील संबंधित तरुण वारंवार फोन करून त्यांना त्रास देतात. शेवटी त्रासलेले नातेवाईक संबंधित कर्जदाराला फोन करून प्रकरण मिटवण्याची विनंती करतात. मात्र, कर्जदार आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून मी आपला नंबर कोठेही दिला नसल्याचे स्पष्ट करतात. वरचेवर अशा तक्रारी येऊ लागल्याने वसुली एजन्सीच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

वसुलीच्या वादातून गोळीबारसारखे गंभीर प्रकार

कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या रिकव्हरी एजंटला धमकावण्यासाठी प्रशांत सुतार (रा, श्रीकृष्ण सोसायटी, जलवायु विहार, मोशी प्राधिकरण) याने थेट भिंतीवर गोळीबार केला. ही धक्कादायक घटना 11 मे रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास श्रीकृष्ण सोसायटी, जलवायू विहार, मोशी प्राधिकरण येथे घडली होती. याप्रकरणी अमोल बापू ठोंबरे (30, रा. अमृता कृपा सोसायटी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कारवाईनंतरही सुधारणा नाही

कर्जदाराच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी वसुली एजंटवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, तरीदेखील एजंटच्या वर्तणुकीवर काही परिणाम होत नसल्याचे अधोरेखित होत आहे. थेरगाव येथे एका एजंटने महिलेच्या घरासमोर जाऊन तोडफोड करीत दहशत माजवली होती. याची दखल घेत त्या वेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी वसुली करणार्‍या एजंटची मुस्कटदाबी केली होती. मात्र, आता पुन्हा एजंटची दहशत वाढू लागली आहे.

…तर थेट गुन्हे दाखल करू

वसुली एजंटने नियमांच्या अधीन राहून काम करावे. सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये. जर, अशा प्रकारे कोणी त्रास देत असल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. वसुली एजंटवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.
– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
आर्थिक अडचणींमुळे मी बँकेचे हप्ते भरू शकलो नाही. दरम्यान, मला बँकेकडून हप्ते बनण्यासाठी फोन येत होते. दरम्यान, काही वसुली एजंटने मला फोन करण्यास सुरुवात केली. संबंधित वसुली एजंटला भेटून मी काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, तरीदेखील एजंटने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी संबंधित वसुली एजंटचे फोन उचलणे बंद केले. त्यानंतर माझ्या घराशेजारी राहणार्‍या एका महिलेच्या मोबाईलवर वसुली एजंटने फोन केला. माझे नाव घेऊन महिलेशी अर्वाच्य भाषेत संभाषण केले. संबंधित महिलेने मला याबाबत विचारणा केली. मात्र, मी महिलेचा नंबर कोठेही दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर महिलेने संबंधित एजंटच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.
– थकीत कर्जदार, पिंपरी
हेही वाचा

Back to top button