Nagar News : स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात भाळवणी शाळा सर्वोत्तम | पुढारी

Nagar News : स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात भाळवणी शाळा सर्वोत्तम

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील भाळवणी शाळेची पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात सर्वोत्तम शाळा म्हणून निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या नोंदणीकृत 64 हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी 100 शाळांचा सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे. महाराष्ट्र कचर्‍याबाबत ‘निष्काळजी मुक्त’ करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा 2 ऑक्टोबर रोजी झाला. हा टप्पा शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे, हे समजण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. या प्रकल्पात विद्यार्थी स्वतः कोणतेही झाडू घेऊन भाषणबाजी करणारे नसून, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे, संदेश देणारे दूतही नसून तर कळत नकळत झालेली समाजातील चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे ‘स्वच्छता मॉनिटर’ आहेत.

या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला होता. 64 हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणार्‍यांना आणि थुंकणार्‍यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते.

पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या राज्यातील नोंदणीकृत 64 हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी शंभर शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे होणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भाळवणी राज्यातील सर्वोत्तम 100 च्या यादीत समाविष्ट आहे. त्याचबरोबर निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ ओळखपत्राने गौरविण्यात येणार आहे. स्वच्छता मॉनिटर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आबुज यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकीर लोकांना थांबविण्यास प्रोत्साहित केले आणि शाळा समन्वयक एन. ए. सुंबे आणि सर्व वर्गशिक्षक बी. ए. मते, एस. व्ही. दरेकर, डी. एस. सिनारे, यू. एस. शिंदे, आर. ए. पंदारे, सी. जी. रोहोकले यांनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन दिले.

Back to top button