Dhule Crime : पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या करणाऱ्या सहा जणांना बेड्या | पुढारी

Dhule Crime : पूर्व वैमनस्यातून तरुणाची हत्या करणाऱ्या सहा जणांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; पूर्व वैमनस्यातून तरुणाची निर्गुण हत्या करणाऱ्या सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने अटक केली आहे. या सर्व आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. (Dhule Crime)

धुळे शहरातील महात्मा गांधी चौकात पूर्ववैमनस्यातून शुभम जगन साळुंखे याला गुन्हेगारांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कचरा डेपो येथे घेऊन गेल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याला तेथेच फेकून देण्यात आले. दरम्यान ही माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गंभीर जखमी असलेल्या शुभम याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात विनायक जगन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी तातडीने हालचाली करीत मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली. या गुन्ह्याचा तपास आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी समांतरपणे सुरू केला. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला शुभम वर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी गणेश अनिल पाटील हा धुळ्यातून फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याला बाजार समितीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तसेच या गुन्ह्यातील आरोपी महेश उर्फ घनश्याम प्रकाश पवार, गणेश साहेबराव माळी, जगदीश रघुनाथ चौधरी हे धुळे येथून नाशिकला पळून गेले होते. तसेच नाशिक येथून संगमनेर मार्गे ते पुणे येथे पोहोचल्या बाबतचे माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीस पथकाला मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्यात आले. या पथकाने या आरोपींचा शोध घेणे सुरू केले. यावेळी दिघी येथील मॅक्झिम चौकात आरोपी मोटरसायकलचे उभे असल्याची निदर्शनास आले. मात्र पोलीस पथक आल्याचा संशय आल्याने या आरोपींनी मोटरसायकल सोडून तेथून पलायन केले. त्यामुळे त्यांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपी अक्षय श्रावण साळवे, जयेश रवींद्र खरात, हे राजस्थान येथे पसार झाल्याची माहिती निदर्शनास आली. त्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीची माहिती गोळा करण्यात आली. Dhule Crime

यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. या पथकाने या आरोपींच्या शोध घेतला असता ते अजमेर येथून इंदोर कडे लक्झरी बसने येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या पथकाने रतलाम नजीक लक्झरी बसची तपासणी सुरू केली. यात एका बस मध्ये अक्षय साळवे आणि जयेश खरात हे दोघे आढळून आले. त्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. या सर्व सहा आरोपींना धुळे येथे आणण्यात आले असून त्यांची गुन्हेगारी माहिती तपासण्यात आली आहे .यात महेश पवार यांच्या विरोधात 15 गुन्हे, अक्षय साळवे यांच्या विरोधात नऊ गुन्हे, गणेश माळी विरोधात दोन गुन्हे, जगदीश चौधरी विरोधात चार गुन्हे ,जयेश खरात विरोधात 12 गुन्हे दाखल असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे या गुन्हेगारी टोळक्याच्या विरोधात मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या अट्टल गुन्हेगारांना सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, रविकिरण राठोड, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, सुशील शेंडे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, योगेश साळवे, अमोल जाधव या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या पथकाच्या कामगिरी बाबत देखील पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

Back to top button