Pune : जुन्नरमध्ये बिबट्याचे भर दिवसा दर्शन नित्याचे ; हल्ले वाढले | पुढारी

Pune : जुन्नरमध्ये बिबट्याचे भर दिवसा दर्शन नित्याचे ; हल्ले वाढले

सुरेश वाणी

नारायणगाव : वन्यप्राणी म्हणून ओळख असलेल्या बिबट्याचे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात भरदिवसा दर्शन नित्याचे झाले असून, त्याचा मानवी भागात वावर वाढला आहे. बिबट्याकडून मानवावर हल्ला होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचा विचार करता बिबट्यांच्या निवार्‍यासाठी सुरक्षित जागा, लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात असलेला जंगल भाग, पिण्यासाठी मुबलक पाणी व खाण्यासाठी सहज उपलब्ध होणारे अन्न, या गोष्टी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक प्रमाणात मिळतात. परिणामी, हा भाग पूर्वीपासून बिबट्यांचा मूळ अधिवास म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने तसेच तलाव, पाझर तलाव, छोटी-मोठी धरणे बांधण्यासाठी व रस्तारुंदीकरणासाठी मानवाने बिबट्यांचा मूळ अधिवास असणार्‍या जंगलांवर अतिक्रमण केल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला असून, मानवी वस्तीलाच त्याने आपले नैसर्गिक अधिवास बनविले आहे.

अहिनवेवाडी, चिल्हेवाडी, पानसरेवाडी, घुले पट, उंब—ज पांध, रोहोकडी, पाचघर, आंबेगव्हाण, उदापूर, कुलवडे मळा, माळवाडी, नेतवड, डिंगोरे, नारायणगाव, येडगाव, ओझर, आर्वी, खोडद या भागांमध्ये बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होत असून, या भागांतील नागरिक भयभीत झाले आहेत. कोणत्या क्षणी बिबट्याचा हल्ला होईल, हे सांगता येत नसल्याने या भागातील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या भागातील काही पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास घाबरत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावले जात आहेत. मात्र, पिंजरा लावलेला असतानाही बिबट्या पिंजर्‍याजवळ फिरकूनही पिंजर्‍यात न गेल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. म्हणूनच असे पिंजरे लावून त्यात कैद झालेले बिबटे परत याच भागात सोडले जातात की काय? असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.

बिबट सफारीची घोषणा कागदावरच
नुकताच जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला असून, आंबेगव्हाण येथे सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर बिबट सफारी पार्क होणार असल्याची घोषणा करण्यात आली. घोषणा होऊन अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या बिबट सफारी पार्कचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

माणिकडोहमधून सोडलेले बिबटे पुन्हा याच भागात
पकडलेले बिबटे ठेवण्यासाठी जुन्नरजवळ माणिकडोह बिबट निवारा केंद्र आहे. मात्र, या निवारा केंद्रात मर्यादित बिबटे ठेवण्याची सोय असून, नव्याने पकडलेले बिबटे ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने अशा बिबट्यांना पुन्हा इतरत्र सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हे इतरत्र सोडलेले बिबटे अन्न व पाण्याच्या शोधात पुन्हा मानवी वस्तीकडे येत असल्याचेही या नागरिकांकडून बोलले जात आहे. सोडून दिलेला बिबट्या पुन्हा त्याच भागात येत असल्याचे समोर आले आहे. वन विभाग याला दुजोरा देत आहे.

हेही वाचा : 

Back to top button