Fire Incident : ओतूर येथील गोदामाला भीषण आग | पुढारी

Fire Incident : ओतूर येथील गोदामाला भीषण आग

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर (ता. जुन्नर) येथील मोनिका चौकालगत असलेल्या लिंबानी ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरिअल दुकानाच्या गोदामाला सोमवारी (दि. 9) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे 30 लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची माहिती दुकानमालक मगणलाल (शंकर) गंगाराम पटेल यांनी दिली. या गोदामाजवळील शेतात उसाचे पाचट जाळण्यात आले होते. याच्या झळा लागून गोदामाला अचानक मोठी आग लागली व तेथील पाण्याच्या प्लास्टिक टाक्या, फायबर पाइप, प्लंबिंग मटेरिअल, बेसिन, प्लायवूड, टाईल्स इत्यादी साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, गोदामातील मजूर जेवायला बाहेर गेले असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित बातम्या :

आग लागल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे हे पोलिस हवालदार नरेंद्र गोराने, दत्ता तळपाडे, सखाराम झुंबड, रोहित बोंबले यांच्यासह तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रचंड बघ्यांची गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली व जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.
या आगीचे उंचच उंच लोळ उठल्याने व संपूर्ण परिसर धुराने व्यापल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. जवळपास असणार्‍या दुकानमालकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण पसरले होते. गावामध्ये काही वेळ वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता.

Back to top button