जुन्नरच्या 26 ग्रा.पं. निवडणुकीची धामधूम सुरू | पुढारी

जुन्नरच्या 26 ग्रा.पं. निवडणुकीची धामधूम सुरू

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्यातील 26 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवारांची शोधाशोध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी गटाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. मुक्ताई हनुमान पॅनेलच्या नेत्यांनी नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरात बैठक घेतली. नारायणगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे, माजी सरपंच बाबू पाटे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला खैरे-पाटे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात बाळासाहेब पाटे, संतोष वाजगे, माजी सरपंच अशोक पाटे, आशीष माळवदकर, प्रल्हाद पाटे, विकास तोडकरी, अ‍ॅड. राजू कोल्हे, शरद दरेकर, दादाभाऊ खैरे, राजेंद्र बोरा, अक्षय खैरे, वसंत तांबे, अशोक तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असलेल्या नागरिकांना माजी सरपंच बाबू पाटे, संतोष खैरे यांनी मार्गदर्शन केले. भाजप नेत्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला व काही कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत, असे बाबू पाटे यांनी सांगितले. संतोष खैरे म्हणाले की, माजी सरपंच बाबू पाटे यांच्याकडून गेल्या पाच वर्षांत अंतर्गत रस्ते, गटार योजना, कचरा विल्हेवाट आदी प्रश्न मार्गी लावले आहेत.
या वेळी खैरे म्हणाले की, समोरची मंडळी अफवा पसरवत आहेत. आमची ही प्राथमिक चर्चा करायला बैठक आहे. समोरून काही समजुतीचा अगर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. कोरोना काळात बाबू पाटे यांनी चांगले काम केले म्हणून बैठकीत सगळ्यांनी कौतुक केले.

मागील निवडणुकीतील सोबती आता विरोधात
मागील निवडणुकीत सरपंचपदाच्या निवडणुकीत बाबू पाटे यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे संतोष वाजगे सोबत आले आहेत. त्यांनी पाटे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मागील निवडणुकीत बाबू पाटे व संतोष खैरे यांच्यासोबत असणारे सुजित खैरे या वेळी मात्र समोरच्या मंडळीला जाऊन मिळाल्याचे बोलले जात आहे. ते आजच्या बैठकीला नव्हते. समोरच्या बैठकींना ते हजेरी लावत असल्याचे समजते.

Back to top button