Anandacha Shidha : आनंदाच्या शिधाला सर्व्हर डाऊनचे विघ्न; नागरिकांना धान्य मिळण्यात होतोय विलंब | पुढारी

Anandacha Shidha : आनंदाच्या शिधाला सर्व्हर डाऊनचे विघ्न; नागरिकांना धान्य मिळण्यात होतोय विलंब

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने गाजावाजा करून गणेशोत्सव काळात वाटप सुरू केलेल्या आनंदाच्या शिधाला सध्या सर्व्हर डाऊनचे विघ्न येत आहे. त्यामुळे नागरिकांना धान्य मिळण्यात विलंब होत आहे. गौरी-गणपती आगमनानिमित्त रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अन्न व नागरीपुरवठा विभागाने घेतला होता. आनंदाचा शिधामध्ये 100 रुपयात प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल देण्यात येत आहे. ई-पॉस प्रणालीद्वारे हा आनंदाचा शिधा शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या दिला जात आहे. अंत्योदय अन्न योजना आणि अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत आहे.

सर्व्हर डाऊनचा मनस्ताप

ऐन गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटपामुळे रेशन धान्य दुकानदारांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. त्यातच आता ई-पॉस मशीनवर सर्व्हर डाऊनचा अडथळा जाणवत आहे. त्यामुळे ही मशीन काही काळ बंद पडत असल्याने रेशनकार्ड धारकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरिकांवर ताटकळत थांबण्याची वेळ

गेल्या वर्षभरापासून आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम सरकारने सुरू केला आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या कालावधीत सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. शिधा वाटपाच्या निर्णयामुळे सामान्य जनतेत समाधान व्यक्त केले जात होते. हा शिधा गणेशोत्सवाच्या किमान आठ दिवस आधी स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याचे वाटपही सुरु झाले. मात्र, नेहमीप्रमाणे सर्व्हर डाउनचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसत आहे. पर्यायाने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना धान्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे.

शहरातील जवळपास 80 ते 85 टक्के नागरिकांपर्यंत आनंदाचा शिधा पोचला आहे. पावसामुळे सध्या इंटरनेटची समस्या जाणवत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होऊन काही काळ ई-पॉस मशीनवरील कामकाज
थांबत आहे.

– विजय गुप्ता, खजिनदार,
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन

सर्व्हर डाऊनच्या समस्येने ई-पॉस मशीन बंद पडत आहे. ही समस्या दिवसभरातून साधारण अर्धा ते दीड तास जाणवत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा देण्यास उशीर होत आहे. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही सकाळी लवकर स्वस्त धान्य दुकान सुरू करत आहोत.

– विक्रम छाजेड,
स्वस्त धान्य दुकानदार.

हेही वाचा

आनंदाच्या शिध्याला सोनकिड्यांची बाधा तर पामतेलाने घशात खवखव

Pimpri News : प्रोजेक्ट मुलांचे डोकेदुखी पालकांची!

Ganesh Ustav : नवसाला पावणारा मुगवलीचा श्री स्वयंभू गणपती

Back to top button