Ganesh Ustav : नवसाला पावणारा मुगवलीचा श्री स्वयंभू गणपती

Ganesh Ustav :  नवसाला पावणारा मुगवलीचा श्री स्वयंभू गणपती
Published on
Updated on

माणगाव :  मराठी मनाचे गणेश हे लाडके दैवत आहे, त्या गणेशाची पुजाअर्चा करूनच शुभकामाला सुरूवात केली जाते. कोकणात या गणेशोत्सव काळात भक्तीला उधाणच येते. गजाननाची अनेक रुपे आहेत. त्यापैकीच एक असलेल्या माणगाव जवळील मुगलीच्या गणपतीचे स्थान हे जागृतम्हणून परिचीत आहे. शिवाय भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणूनही त्याची सर्वत्र ख्याती आहे. रायगड जिल्हातील मुंबई – गोवा महामार्गावर माणगावपासून ३ कि. मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथून अवघ्या दिड किमी अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. मुगवली हे शंभर ते सव्वाशे घरांचे छोटे गाव आहे. गाव जरी छोटे असले, तर या गणपतीमुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. (Ganesh Ustav )

सुमारे ३२५ वर्षापूर्वी मुगवलीच्या परिसरातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करीत होता. अचानक शेतातील एका दगडास नांगराचा फाळ लागून तेथून रक्त येऊ लागले. हे पाहून त्या शेतकऱ्याने गावाकडे धाव घेऊन घडलेली सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. सर्व ग्रामस्थांनी याबाबत गोरेगावच्या जाणकारांचा सल्ला घेतला व हे गणेशाचे स्वयंभू महास्थान आहे, असे त्यांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी त्या पाषाणाभोवतालची जागा स्वच्छ केली. त्यानंतर सर्वांनाच नैसर्गिक अवस्थेतील गणेशाचे मोहक दर्शन झाले. ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या दोन फूट लांबी- रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत असून, मस्तक, उभी वळलेली सोंड, पोट अशा स्वरुपाची आहे. मागील बाजूस सिंह असून, त्यास पाठ टेकून खाली पाय सोडून तो बसलेला आहे. गणेशाचे नेत्र नैसर्गिक अवस्थेत असल्यामुळे त्याचे डोळे बोलके वाटतात. सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी सुप्तावस्थेत असलेल्या या जागृत गणेशासाठी सुरूवातीस एक कुडाचे मंदिर उभारले. त्यानंतर प्राचीन काळातील या मंदिराचा ३५ वर्षापूर्वी जीर्णोद्धार करून गाभान्यात संगमरवरी दगड बसविण्यात आला व मंदिरही थोडे प्रशस्त करण्यात आले. (Ganesh Ustav )

१९६८ साली मुगवलीच्या स्थानिक स्वयंभू गणेश मंडळाने गणेश व्यवस्थापन समिती स्थापन करून श्रींच्या भोवती उत्तमपैकी छोटासा गाभारा बांधला आणि दररोजच्या गणेशपुजेची व्यवस्था केली. पूर्वीच्या जुन्या कौलारू मंदिराचे रुपांतर आता भव्य अशा सिमेंट कॉंक्रीटच्या २२ फूट रुंद व ३० फूट लांब अशा सुंदर मंदिरात झाले आहे. मंदिराचे शिखर मुंबई -महाड महामार्गावरील मुगवली फाट्याजवळूनही दिसते.

येथील गणेश हा पूर्वाभिमूख आहे. त्यामुळे गणेशाच्या मूर्तीवर दररोज सूर्यकिरण पडावेत अशीही कल्पकता मंदिर बांधताना योजण्यात आली आहे. हा गणेश नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने हा गणपती जागृत देवस्थान म्हणून परिचीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच मुंबई-पुण्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येऊन येथे नवस बोलतात व आपण बोललेला नवस फेडण्यासाठीही मोठ्या संख्येने येत असतात. (Ganesh Ustav )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news