विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना जीवदान | पुढारी

विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना जीवदान

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील आर्वी पिंपळगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या दोन बछड्यांना येथील तरुणांनी जीवदान दिले. तरुणांनी केलेल्या या धाडसी कृत्याचे वन विभागासह परिसरातून कौतूक होत आहे. अनिकेत गावडे, वैभव खिलारी, अमित तोडकर, शुभम वाणी, भूषण खांडगे, आदिनाथ राजगुरू, पांडुरंग गावडे या तरुणांनी बिबट्याच्या बछड्यांना जीवदान दिले. अनिकेत गावडे हा बुधवारी (दि. ६) हे सकाळी साडेनऊ वाजता नदीकडेला असणाऱ्या त्यांच्या विहिरीवरील वीजपंप चालू करण्यास गेले होते.

विहिरीत डोकावून पहिले असता त्याला बिबट्याचे दोन बछडे पडल्याचे दिसले. त्याने तातडीने त्याचा मित्र वैभव खिलारी, अमित तोडकर, शुभम वाणी, भूषण खांडगे, आदिनाथ राजगुरू, पांडुरंग गावडे याच्यासह निसर्ग फाउंडेशनच्या सदस्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून हॉलीबॉलच्या नेटद्वारे बछड्यांना विहिरीबाहेर सुखरुप काढले.

बछडे रात्रभर पाण्यात असल्याने गारठले होते. त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. त्यामुळे त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विलास गुंजाळ यांना तातडीने बोलावून बछड्यांवर उपचार केले, त्यानंतर त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. तरुणांनी या घटनेची माहिती वन विभागास कळवली. वन विभागाकडूनही या तरुणांचे कौतुक करण्यात आले.

अनिकेत गावडेंची विहीर नदीच्या कडेला असून विहिरीभोवती गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे बछडे विहिरीत पडल्याचा अंदाज येथील तरुणांनी व्यक्त केला. विहिरीच्या आजूबाजूस बिबट मादीचे पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे मादीने बछड्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

आमदारांच्‍या पगारात ४० हजार रुपये वाढ : ममता बॅनर्जींची घाेषणा

पिंपरी : लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी बंदची हाक

Back to top button