राजगुरुनगर बाह्यवळण घाट डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका | पुढारी

राजगुरुनगर बाह्यवळण घाट डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरजवळच्या नवीन बाह्यवळण घाटातील डोंगराच्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरडी कोसळून महामार्गावर आल्यास अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. चांडोली टोल नाक्यापासून व राजगुरुनगर शहराबाहेरून राक्षेवाडी, होलेवाडी, टाकळकरवाडी, भांबुरवाडी, तुकईवाडी आणि पानमळा येथून डोंगर खोदून बाह्यवळण महामार्ग घाटाचे काम झालेले आहे. सध्या बाह्यवळण घाट महामार्गे वाहतूक सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावर पाणी मुरून भेगा पडून दरडी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. रोजच महामार्गावर दरडीचा काही भाग महामार्गावर येत आहे.

बाह्यवळण महामार्गाचे काम करताना घाटातील दरडी कोसळण्याचा धोका वाटत आहे, अशा ठिकाणी एनएचएआय विभागाने संरक्षक जाळी लावली नाही. त्यामुळे दररोज दरडी रस्त्यावर येत आहेत. डोंगराच्या तीन-चार ठिकाणी दरडी कोसळून महामार्गावर आल्यास वाहतूकदेखील बंद होण्याचा धोका आहे, तर त्यामुळे महामार्गावरून जाणार्‍या वाहनांना मोठी दुर्घटना होऊ शकते.
पानमळापासून ते आकाश व आस्वाद मिसळपर्यंत डोंगराच्या भागात दरडी कधीही कोसळण्याची शक्यता अधिक आहे. महामार्ग विभागाने दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांकडून होत आहे.

Back to top button