Pune Metro Update : मेट्रोचे ब्रेक लावल्यावर होणार वीजनिर्मिती; पुण्यातील ‘या’ मार्गावर अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम’चा वापर | पुढारी

Pune Metro Update : मेट्रोचे ब्रेक लावल्यावर होणार वीजनिर्मिती; पुण्यातील ‘या’ मार्गावर अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टिम’चा वापर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर-हिंजवडी पुणेरी मेट्रोमध्ये आता अत्याधुनिक अशा ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम’चा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेचे वैशिष्ट्य असे की, हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर जेव्हा आणि जितक्या वेळा मेट्रो ट्रेन ब्रेक लावेल त्या वेळी होणार्‍या घर्षणातून वीज निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे वीज खर्च वाचणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ही स्वच्छ विकास यंत्रणा अंतर्गत विविध प्रकल्प विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

या अंतर्गत मेट्रोच्या कामकाजामधून होणार्‍या कार्बन डायऑक्साइडच्या संभाव्य उत्सर्जनामध्ये नियंत्रण राखणे, ते कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ऊर्जेची पुनर्निर्मिती किंवा फेरवापर करणे. हा फेरवापर शक्य करणारी अत्याधुनिक अशी ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी’ पुणेरी मेट्रोमध्ये वापरण्याची आमची योजना आहे, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम म्हणजे काय?

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. जी वाहन किंवा वस्तूची गतिशील ऊर्जा, अशा स्वरूपात रूपांतरित करते, जी एकतर त्वरित वापरली जाऊ शकते किंवा आवश्यकतेपर्यंत संग्रहित केली जाऊ शकते. मेट्रो ट्रेनच्या प्रक्रियेत जेव्हा ट्रेनला ब्रेक लावले जातात तेव्हा गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्समधील विद्युतप्रवाहात साठवली जाते. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणूनदेखील कार्य करते. ही एक ऊर्जा-बचत प्रक्रिया असते. कारण, पुन्हा निर्माण केलेली विद्युत ऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते.

‘पुणेरी मेट्रो’ची ब्रेकिंग सिस्टिम कशी काम करेल?

हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान धावणार्‍या पुणे मेट्रो लाइन 3 म्हणजेच पुणेरी मेट्रोच्या प्रत्येक बोगीमध्ये इलेक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टिम असेल. तिचा वापर करून या ट्रेनचे मोटर्स ब्रेक कम पॉवर जनरेटर म्हणून काम करतील. नेहमीच्या वेगाने ट्रेनला इलेक्ट्रिक ब्रेकिंग लागू होईल. मात्र, जेव्हा ट्रेनचा वेग ताशी 10 किमी किंवा त्याहून कमी होईल तेव्हा इलेक्ट्रो-न्यूमॅटिक ब्रेकिंग सिस्टिम लागू केली जाईल. पुणेरी मेट्रोच्या प्रत्येक बोगीमध्ये असे दोन स्वतंत्र इलेक्ट्रो-न्यूमॅटिक सर्किट्स असतील.

एक सर्व्हिस सर्किट आणि एक सहायक सर्किट मेट्रो बॉडीखाली बसविलेले इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूल एकाच वेळी काम करेल. इलेक्ट्रो-न्यूमॅटिक मॉड्यूलमध्ये ब्रेक सक्रियीकरण उपकरणे असतील, ज्यामध्ये वायवीय दाबनिर्मिती, दाबनियमन आणि इलेक्ट्रिक ब्रेक नियंत्रण यांचा समावेश असेल. या सर्व घटकांचे स्वतंत्र ब्रेक कंट्रोल युनिटद्वारे इलेक्ट्रो-न्यूमॅटिकली नियंत्रण आणि निरीक्षण केले जाईल.

हेही वाचा

पुणे : वस्तीतील मुलांचीही जुळतेय संगीताशी नाळ

मुंबई : कल्याण रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाड; प्रवाशांना फटका

‘पुढारी न्यूज’ टी.व्ही. चॅनलचे आज लाँचिंग

Back to top button