‘रुग्णवाहिकांसाठी निधी कमी पडू देणार नाही’ शासनाचा निर्णय | पुढारी

‘रुग्णवाहिकांसाठी निधी कमी पडू देणार नाही' शासनाचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा: गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा उपक्रम सुरू आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 102 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने निधी कमी पडू न देण्याचा निर्णय घेतला आहे. जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जातो. वाहतुकीच्या अपुर्‍या सुविधा व आर्थिक अडचणींमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयामध्ये 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जननी शिशू सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला पुरेसा निधी मिळत असल्याने रुग्णसंख्या वाढली तरी सेवेवर परिणाम होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे 101 रुग्णवाहिका आहेत. त्यांच्या इंधनासाठी शासनाकडून जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वर्षाला पुरेसा निधी दिला जातो. त्यामुळे लाभार्थी आणि आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना रुग्णवाहिका मिळत आहे. जिल्ह्यात 101 जुनी आणि नवी 7 अशी एकूण 108 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यांच्याकडे 102 क्रमांक डायल केल्यावर येणार्‍या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिकांना पुरेसे डिझेल आणि निधी दिला जात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

प्रसूती झालेल्या महिलांना घरपोच सेवा देण्यासाठी जिल्ह्यात 101 रुग्णवाहिका आहेत. जननी शिशू सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण फॅमिली प्लॅनिंग आणि जिल्हा परिषद या तीन माध्यमांतून त्यांना निधी दिला जातो. आता लवकरच पेट्रोकार्डची सुविधा सुरू केली जाणार आहे.
                                   – डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

हेही वाचा :

सोन्यासारख्या जमिनी विकू नका : राज ठाकरे

पुणे विभागात पाणी टंचाई होतेय तीव्र; उन्हाळ्यात 54 तर पावसाळ्यात 155 टँकर

Back to top button