अफू विकणार्‍या राजस्थानमधील टोळीचा पर्दाफाश | पुढारी

अफू विकणार्‍या राजस्थानमधील टोळीचा पर्दाफाश

चाकण : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने राजस्थान येथील अफू विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अफूची पोती विकण्याआधीच पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून तब्बल 60 किलो अफू जप्त केला आहे. ही कारवाई चाकण एमआयडीसी हद्दीत महाळुंगे (ता. खेड) गावाच्या हद्दीत एका गोदामात करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश जीवनराम बिश्नोई, कैलास जोराराम बिश्नोई आणि मुकेश गिधारीराम बिश्नोई अशी अटक करण्यात आलेल्या मूळच्या राजस्थान येथील आरोपींची नावे आहेत.

महाळुंगे येथील एका गोडाऊनमध्ये राजस्थान येथील टोळी अफू साठवत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. या ठिकाणी टेम्पोतून अफूची पोती आणली जात होती. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस कर्मचार्‍यांनी आठ दिवस गोडाऊनवर लक्ष ठेवले. या टोळीचा मुख्य सूत्रधार राकेश जीवनराम बिश्नोई याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गोडाऊनमध्ये जाऊन 60 किलो अफू पोलिसांनी जप्त केला. त्याची किंमत 8 लाख 74 हजार रुपये असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने दिली आहे. अफूची छोटी-छोटी पॅकेट करून ती नशा करणार्‍या व्यक्तींना विकली जाणार होती. एक किलो अफूची किंमत 15 हजार रुपये असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यातील आरोपींनी अफूचा साठा राजस्थान येथून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजस्थानमधील आरोपीचा शोधदेखील पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने केली आहे.

गॅस एजन्सीचे नाव; अफूचा बाजार
राज्यस्थानमधून ही अफूची तस्करी महाराष्ट्रात केली जात होती. त्याप्रकरणी मूळच्या राज्यस्थानातील तिघांना अटक करण्यात आली आहे. गॅस एजन्सीच्या नावाखाली ते अमली पदार्थाचा अवैध धंदा महाळुंगे (ता. खेड) येथे एका गोदामात करीत होते. त्यांची ही गॅस एजन्सीसुद्धा बेकादेशीरच आहे. तेथे ते घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यापारी सिलिंडरमध्ये धोकादायकपणे भरत असल्याची बाब समोर आली आहे.

Back to top button