राख्यांच्या स्टॉलसाठी फांद्यांवर कुर्‍हाड ! | पुढारी

राख्यांच्या स्टॉलसाठी फांद्यांवर कुर्‍हाड !

खडकी : पुढारी वृत्तसेवा : मोलेदिना रस्त्यावरील पोलिस लाईनच्या भिंतीलगत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रशासनाच्या वतीने राखीच्या स्टॉलसाठी मांडव घालण्यात येत आहे. यासाठी रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांसह रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाने झाडांच्या फांद्या तोडू नयेत, तसेच राखीचे स्टॉल इतर ठिकाणी हलविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी राखीच्या स्टॉलसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यात येते. पोलिस लाईनच्या भिंतीशेजारी हे स्टॉल उभे करण्यात येतात. यंदादेखील हे स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. या स्टॉलसाठी रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिक व रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकडे सरकारच्या वतीने ’झाडे लावा, झाडे जगवा’ अभियान राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून त्यांना नुकसान पोहोचवले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या ठिकाणी गर्दी होत असल्याने गणेश मूर्तीच्या स्टॉलसाठी खडकी बस स्थानकाजवळ जागा निश्चित केली होती. त्या ठिकाणी राखीचे स्टॉलदेखील हलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

राखीच्या स्टॉलसाठी अडथळा ठरणार्‍या काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र, नागरिकांनी प्रशासनाला अर्ज दिल्यावर फांद्या तोडण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
                             -शिरीष पत्की, उद्यान अधीक्षक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

Back to top button