पुण्यात मोहोळ की धंगेकर? उत्कंठा शिगेला; कार्यकर्ते हमरीतुमरीवर

पुण्यात मोहोळ की धंगेकर? उत्कंठा शिगेला; कार्यकर्ते हमरीतुमरीवर

[author title="ज्ञानेश्वर बिजले" image="http://"][/author]

पुणे : लोकसभा निवडणुकीचे देशातील मतदान संपल्यानंतर, जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुण्यातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने कौल दर्शविण्यात येत असला, तरी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे समर्थकही आशावादी आहेत. मतदारसंघाच्या विविध भागांत झालेले मतदान, तेथे मिळणारी आघाडी अशी विविध आकडेवारी सादर करीत आम्हीच जिंकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरीवर येऊन होत आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी (दि. 4) सकाळी सुरू होत असून, त्या निकालाबाबत पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुण्यात लोकसभेच्या गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळविले होते. विधानसभा निवडणुका तसेच महापालिकेची निवडणूक भाजपने एकहाती जिंकली. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार त्यांच्या समर्थकांसह महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे, प्रारंभी भाजपचे पारडे जड वाटत होते.
काँग्रेसने धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर निवडणुकीत रंग भरला. त्यांची प्रचारयंत्रणा विस्कळीत असली, तरी वेगवेगळ्या भागांत, विशेषतः वस्ती भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता.

आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते हिरिरीने प्रचारात सहभागी झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्तेही प्रचारात आघाडीवर होते. विदर्भातील अनेक आमदार शेवटच्या टप्प्यात पुण्यात प्रचारासाठी तळ ठोकून होते. भाजपने चारशे जागा जिंकल्यास, संविधानात बदल करणार, हा विरोधकांच्या प्रचार वस्तीभागात विरोधकांना ताकद देऊन गेला. त्यातच प्रथमत: मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार अशी लढत होत असल्याने त्याचेही पडसाद मतदानात उमटण्याची शक्यता आहे.

वडगाव शेरी ठरणार निर्णायक

पाच विधानसभा मतदारसंघांतील कल आणि कार्यकर्त्यांची चर्चा विचारात घेतल्यास, तेथे कोणाच्या पारड्यात फारसे लीड मिळाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, निकालाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका ही वडगाव शेरी मतदारसंघाची ठरणार आहे. पुण्यात 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 68 हजारांनी मतदान वाढले आहे. त्यापैकी सुमारे 35 हजार मतदान वडगाव शेरीत वाढले आहे. हे नवमतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, ते महत्त्वाचे ठरणार आहे. वडगाव शेरीत सर्वाधिक म्हणजे दोन लाख 41 हजार मतदान झाले आहे. तेथे वेगवेगळ्या भागांत स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रचारामुळे मतदानाचा कौल बदलत असल्याची चर्चा झाली. मोहोळ यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना येथे सुमारे 30 हजारांचे मताधिक्य मिळेल. तर दुसर्‍या बाजूला धंगेकर यांच्या समर्थकांनीही 30 हजार मताधिक्याचा दावा केला आहे. वडगाव शेरीतील मताधिक्य हे अंतिम निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. तेथे मतमोजणीच्या शेवटच्या 21 व्या फेरीपर्यंत मतांची मोजणी होणार आहे.

कोथरूडमध्ये भाजपला किती लीड ?

कोथरूडमध्ये भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याची आशा आहे. तर, त्याच ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने कंबर कसली आहे. या विधानसभा मतदारसंघात दोन लाख 17 हजार मतदान झाले असून, तेथे किमान 70 ते 80 हजारांचे मताधिक्य मिळण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे. मात्र, ही आघाडी 30 ते 40 हजारांपर्यंत रोखली असल्याचा दावा धंगेकर समर्थकांचा आहे. कोथरूडच्या मताधिक्याच्या जोरावरच भाजपचा विजयाचा दावा अवलंबून आहे.

पर्वतीतही भाजपच पुढे

कोथरूड पाठोपाठ भाजपला आशा आहे ती पर्वती मतदारसंघात मतांची आघाडी मिळण्याची. या मतदारसंघात झोपडपट्टी व वस्तीभागात धंगेकरांनी मुसंडी मारली आहे. भाजपचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे या भागात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप करीत धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. पर्वतीत एक लाख 89 हजार मतदान झाले आहे. पर्वतीत कितीची आघाडी मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये विविध अंदाज वर्तविले जात आहेत.

शिवाजीनगरमध्ये रस्सीखेच

शिवाजीनगर मतदारसंघात दोन्ही बाजूंची जोरदार रस्सीखेच झाली असली, तरी तेथे मतदानाची टक्केवारी सर्वांत कमी आहे. या मतदारसंघात एक लाख 41 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे पाच ते दहा हजार मतांची आघाडी आम्हालाच मिळेल, असे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते ठामपणे सांगत असल्याचे दिसून येते.

मतमोजणीच्या 21 फेर्‍या होणार

मतदान केंद्राच्या संख्येनुसार मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या लहान मतदारसंघांत प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी करण्यात येईल. म्हणजे, प्रत्येक फेरीला 14 केंद्रांवरील मतांची मोजणी होईल. कोथरूडमध्ये 20, तर पर्वतीत 18 टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात येतील. या पाचही मतदारसंघांत मतमोजणीच्या वीस फेर्‍या होतील. वडगाव शेरीत मोजणीसाठी 22 टेबल असून, तेथे 21 फेर्‍यापर्यंत मतमोजणी होणार आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातील फेरी पूर्ण झाल्यानंतर, त्याची बेरीज करून, पुणे मतदारसंघातील त्या फेरीची मतमोजणी जाहीर करण्यात येईल. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी अडीचपर्यंत मोजणी संपण्याची शक्यता आहे.

शहराच्या मध्यवस्तीत काँग्रेसचा जोर

शहराच्या मध्यवस्तीतील पेठा आणि लगतच्या भागात कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मिळून तीन लाख 14 हजार मतदान झाले आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते येथे सक्रिय असले, तरी धंगेकर कसबा पेठेतून पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी निवडून आले. पुणे कॅन्टोन्मेंट हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. माजी खासदार गिरीश बापट यांनाही येथून केवळ बारा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या दोन्ही मतदारसंघांवर महाविकास आघाडीची भिस्त आहे. कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये धंगेकरांना किमान तीस हजार मतांची आघाडी मिळण्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news