पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी ते निगडी या 4.519 किलोमीटर अंतराच्या विस्तारित मार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यातील मार्गिकेच्या व्हायडक्ट या कामाचा ठेका केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आला आहे. सध्या मार्गावरील माती परीक्षणाचे काम सुरू आहे. या कामाची मुदत 130 आठवडे आहे.
पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो व्हावी म्हणून शहरवासीयांची आग्रही मागणी होती. त्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने या विस्तारीत मार्गाच्या 910 कोटी 18 लाख खर्चाच्या कामास 23 ऑक्टोबर 2023 ला अंतिम मान्यता दिली. त्यानुसार निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतच्या 5.519 किलोमीटर अंतराच्या व्हायडक्ट कामाची निविदा काढण्यात आली. हे 339 कोटी खर्चाचे काम केंद्राच्या रेल विकास निगम लिमिटेडला मिळाले आहे.
हा मार्ग उन्नत असून, तो निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणार्या सर्व्हिस रस्ताने उभारला जाणार आहे. या कामासाठी निगडी, भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक, टिळक चौक आदी ठिकाणच्या सर्व्हिस रस्त्यावर बॅरिकेटस लावून माती परीक्षण करण्यात येत आहे. माती परीक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. या कामाची मुदत 130 आठवडे आहे.
हे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर लोहमार्ग टाकणे, सिग्नल व्यवस्था, विद्युतपुरवठा, स्टेशनची उभारणी आदी कामांची स्वतंत्रपणे निविदा काढली जाणार आहे. या संपूर्ण कामाचे काम 3 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निगडीपासून थेट स्वारगेट, रामवाडी आणि वनाजपर्यंत मेट्रोने ये-जा करता येणार आहे.
पिंपरी ते निगडीपर्यंतच्या विस्तारीत मेट्रो मार्गाच्या व्हायडक्टचे काम रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आले आहे. त्याची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. सध्या माती परिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच ठेकेदाराकडून कास्टींग यार्ड सुरू करण्यात येईल. काम मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा