निवडणुकांमुळे शिरूरचे आजी-माजी खासदार सक्रिय | पुढारी

निवडणुकांमुळे शिरूरचे आजी-माजी खासदार सक्रिय

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : लोकसभा निवडणुका जवळ आल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीत आजी-माजी खासदार अधिक सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आंदोलन व विविध कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत, तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या ‘स्टाईल’नुसार गावोगाव बैठका घेऊन थेट मतदारांना भेटण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. याचसोबत एकमेव आरोप-प्रत्यारोपदेखील सुरू असल्याने सध्या शिरूर लोकसभेचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांमध्येच चढाओढ सुरू आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरदेखील परिणाम झाला आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे उध्दव ठाकरेंना ’जय महाराष्ट्र’ करीत शिंदे गटात सहभागी झाले. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर खा. कोल्हे दोन दिवस अजित पवार गटामध्ये, तर सध्या शरद पवार गटात सहभागी झाले.

या सर्व राजकीय महानाट्यानंतर आता सर्वांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून, दोन्ही आजी-माजी खासदार निवडणूक आखाड्यात जय्यत तयारीने उतरल्याचे गेल्या काही दिवसांच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांत भाजपनेदेखील शिरूर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली असून, आपला स्वतंत्र उमेदवार देणार की मित्रपक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा, हे अद्यापही गुलदस्तातच आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला पार्थ पवार यांना शिरूरमधून उमेदवारी देणार, हेदेखील स्पष्ट झालेले नाही. तरीदेखील आजी-माजी खासदारांमुळे सध्या शिरूर लोकसभेचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.फ

वैयक्तिक टीका-टिप्पणींनादेखील जोर
गेल्या चार वर्षांत खासदारांचे दर्शनच झालेले नाही. हाच एक मुद्दा घेऊन सध्या आढळराव पाटील हे डॉ. कोल्हेंच्या विरोधात प्रचार करीत आहेत, तर डॉ. कोल्हे सध्या ‘आढळरावांचे मानसिक संतुलन बिघडले,’ असे आरोप करीत आहेत. भविष्यात आणखी एक-दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास हे वातावरण अधिकच गरम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

पुणे : शिवगंगा खोर्‍यातील कांदा उत्पादक अडचणीत

पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर

Back to top button