पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर | पुढारी

पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा :  ग्राहक आणि विक्रेते देवाण-घेवाण करण्यात व्यस्त असतानाच, अचानक पिंपळाची फांदी भाजी मंडईवर कोसळली आणि क्षणभर कुणालाच काही समजले नाही. सर्वत्र एकच धावपळ उडाली. फांदी खाली अडकलेल्या आठ ते दहा लोकांना नागरिकांनी बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, विक्रेत्यांच्या हातगाड्या व भाज्यांचे नुकसान झाले.
कोंढवा खुर्द मिठानगरमधील भाजी मंडईवर दुपारी 12 च्या सुमारास अचानक पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली. यामध्ये भाजी विक्रते व ग्राहक असे आठ ते दहा नागरिक सापडले होते. उपस्थित लोकांनी त्यांना बाहेर काढले. फांदी कोसळल्याने कुणाला इजा झाली नाही हे नशीब, अशी प्रतिक्रिया भाजी घ्यायला आलेल्या कुदरत उल्ला बेग यांनी व्यक्त केली.

दै. “पुढारी” अनेकवेळा धोकादायक फांद्यांची छाटणी करावी म्हणून वृत्त प्रसिध्द केले आहे व वेळोवेळी अधिकार्‍यांना संपर्कही केला जातोय. मात्र गाडी मिळाली नाही, पाऊस पडतोय, सुटीवर आहे. मला दोन्ही ठिकाणी कामे करायची आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे उद्यान विभागाचे अधिकारी देतात. प्रशासनावर कुणाचा अंकुशच राहिला नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. कोंढवा अग्निशामक दलाच्या जवानांनी फांदी बाजूला केली असून, झाडावरील अन्य धोकादायक फांद्या काढल्या आहेत.

हेही वाचा :

 Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन; कुल्लूमध्ये अनेक इमारती कोसळल्या (Video)

 J&K : डंपर दरीत कोसळून तिघांचा मृत्यू, एक जखमी

Back to top button