मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज धोकादायक गावांबाबत बैठक | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज धोकादायक गावांबाबत बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भोर तालुक्यातील धानवली आणि कोंढरी, तर मुळशी तालुक्यातील घुटके या तीन गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात अधिवेशानात आमदार संग्राम थोपटे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यामुळे गावांच्या पुनर्वसनासंदर्भात आज (दि.23) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि मुळशी तालुक्याचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिह्यात 23 गावे दरडप्रवण असून, भोर तालुक्यातील धानवली आणि कोंढरी, तर मुळशी तालुक्यातील घुटके गावे अतिसंवेदनशील असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया – जीएसआय) या सरकारी यंत्रणांच्या सर्वेक्षणात समोर आले. तसेच या गावांचे तातडीने स्थलांतर करण्याबाबत अहवाल देखील देण्यात आला. जिल्हा प्रशासनाने याबाबत दोन ते तीन वेळा राज्य शासनाकडे या गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याबाबत प्रस्ताव पाठवले. मात्र, राज्य शासनाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याने हे प्रस्ताव धूळ खात पडून होते.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील भूस्खलनाची दुर्घटना घडल्यानंतर पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि मुळशी तालुक्यातील तीन गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत लक्षवेधी मांडली होती. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुनर्वसन मंत्री पाटील यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. भोर आणि मुळशी तालुक्यांतील तीन गावांच्या पुनर्वसनाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी मांडली होती.

Back to top button