पिंपरी : महापालिका जलतरण तलाव खासगीकरणास विरोध | पुढारी

पिंपरी : महापालिका जलतरण तलाव खासगीकरणास विरोध

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : उद्यान, आरोग्य, रूग्णालय तसेच, जलतरण तलाव हे महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत. शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी नागरिकांच्या करातून निर्माण केलेली सोय- सुविधा आहेत. त्यामुळे जलतरण तलावाचे खासगीकरण न करता महापालिकेने सेवा व सुविधा वाढवाव्यात, असे साकडे शहरातील ज्येष्ठ नागरिक, निवृत्त सैनिक, दिव्यांग, राष्ट्रीय व राज्य जलतरणपटू व प्रशिक्षक यांनी महापालिकेच्या क्रीडा विभागास घातले आहे.

या संदर्भात क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजी आढाव, शिवाजी पाटील, राजेंद्र पोतदार, शांतीलाल मापारी, राहुल गावडे, विनोद रेहमाने, महेश पवार, विजय सावंत, मनोजकुमार पवार, मोहन चौधरी, राजू चव्हाण, तन्मय ठाकूर, सुनील ननवरे, नारायण केसवड, जयंत मरळीकर, कैलास तापकीर आदी उपस्थित होते.
दैनंदिन तिकीट दर व त्रैमासिक पास दरात तफावत असावी. तिकीट दर 20 रुपये तर, त्रैमासिक मासिक पास 1 हजार 416 रूपये आहे.

पास काढणार्‍या व्यक्तीच्या सरकारी सुटी व साप्ताहिक सुटी यांचा विचार करण्यात आलेला नाही. ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली पासधारकांची लूट होत आहे. राष्ट्रीय व राज्य खेळाडू, अपंग, निवृत्त सैनिक यांना पूर्वी लागू असलेली 50 टक्के पास सवलत पूर्ववत करावी. ऑनलाइन तिकीट बुकिंग हे एक दिवस अगोदर सायंकाळी पाचपर्यंतच करता येते. सध्या हंगाम नसल्याने अनेकांना आयत्यावेळी प्रवेश नाही. जागा शिल्लक असल्यास आयत्यावेळी येणार्‍यासाठी ऑनलाइन पैसे आकारून प्रवेश दिला जावा.

त्यामुळे पालिकेचे नुकसान होणार नाही. उन्हाळी प्रशिक्षणासाठी भाडेतत्त्वावर तलाव देण्याची प्रक्रिया सुलभ व सोयीस्कर करावी. त्याचे दर तीनपट वाढविल्याने आयोजकांना ते परवडणारे नाही. त्यातून सर्वसामान्यांची लूट होईल. सर्व तलावावर प्रशिक्षक जीवरक्षक नेमले जावेत, अशी मागणी करण्यात आली.

खेळाडूंसाठी सायंकाळी 6 ते रात्री 8 ची वेळ सुरू करावी

शहरातील अनेक खेळाडू सायंकाळनंतर सरावासाठी पुणे व म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलातील तलाव येथे सरावास जातात. महापालिकेने शहरातील तलाव संध्याकाळी सहा ते रात्री आठ वेळ खेळाडूंना सरावास उपलब्ध करून दिल्यास अनेक खेळाडूंना शहरातच सराव करता येईल. त्यातून अनेक खेळाडू तयार होतील, असे प्रशिक्षकांनी सांगितले.

हेही वाचा

आशिया चषकसाठी भारतीय संघाची घोषणा; के. एल. राहुल, श्रेयस अय्यरचे पुनरागमन

Vijayakumar Gavit : मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

Talathi Exam : गरीबाच्या पोरांनी कुठून आणायचे पैसे; तलाठी भरती परीक्षेवरुन वडेट्टीवारांचा निशाणा

Back to top button