अनधिकृत बांधकामे जोमात ; बिबवेवाडी परिसरातील चित्र | पुढारी

अनधिकृत बांधकामे जोमात ; बिबवेवाडी परिसरातील चित्र

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडी परिसरात सध्या अनधिकृत बांधकामे तेजीत आहेत तसेच परिसरात अनधिकृत पथारी व्यावसायिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेत प्रशासक राज आल्यापासून परिसरात अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत आहेत. डोंगर माथ्यावर (सर्वे नं.629) सध्या अनेक बांधकाम प्रशासनाची परवानगी न घेताच सुरू आहेत. या बांधकामांना कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच अनधिकृत गोडावून उभी केली जात आहे. बिबवेवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

डोंगरमाथा परिसरात एक गुंठा जागेवर तीन ते चार मजली इमारती बांधून राजरोसपणे फ्लॅटची विक्री केली जात आहे. त्यामुळे फ्लॅट विकत घेणार्‍यांचे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत बांधकामांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
                                                       -विजय कांबळे,रहिवासी, बिबवेवाडी.

डोंगरमाथा परिसरात 2003 नंतर झालेल्या बांधकामांना परवानगी नाही. तसेच त्यानंतरची बांधकामे अधिकृत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या भागात सुरू असलेल्या बांधकामांची लवकरच पाहणी केली जाईल. त्यानंतर बांधकाम नियंत्रण व अतिक्रमण विभागाकडून त्यावर कारवाई करण्यात येईल.
 -रमेश काकडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम नियंत्रण विभाग, महापालिका.

 

Back to top button