गर्भपात करणारी महिला डॉक्टर गजाआड

गर्भपात करणारी महिला डॉक्टर गजाआड

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पाच मुलींनंतर सहाव्यांदा गर्भवती असलेल्या महिलेला तिच्या पतीने गर्भलिंग निदान चाचणी केली होती. पुन्हा मुलीचाच गर्भ असल्याचे सांगून त्यांना गर्भपात करायला लावला. गर्भपात केल्यावर तो मुलगा निघाला. या प्रकरणात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध छावणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. छावणी पोलिसांनी शनिवारी (दि.31) एजंट ज्ञानेश्वर जाधवला अटक केली होती. यानंतर आज (दि.1) गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला जेरबंद केले आहे. तिच्याकडून या रॅकेटची उकल होण्याची शक्यता आहे.

डॉ. शबाना अश्पाक शहा-सय्यद (४४, रा. प्लॉट क्र. ९, जटवाडा रोड, एकतानगर, हर्सूल), असे अटक केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. ती बीएचएमएस डॉक्टर असून आडूळ आणि हर्सूल येथे दोन वेगवेगळे क्लिनिक चालविते. हर्सूल भागातील तिच्या दवाखान्याचे नाव सानिया क्लिनिक आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी दिली. अधिक माहितीनुसार, सुनील हरी पडूळकर (२९, रा. चेतननगर, तिसगाव, पडेगाव) हा फिर्यादी असून त्याला पाच मुली आहे. त्याची पत्नी सहाव्यांदा गर्भवती राहिल्याचे समजल्यार त्याने एजंट जाधवकडून लिंक लावून डॉ. राजपूतकडे गर्भलिंग निदान केले होते. मुलीचा गर्भ सांगितल्यावर त्याने डॉ. शबानाकडून गर्भपात करून घेतला होता. त्यात तो मुलगा निघाल्यावर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे होते. दरम्यान, जाधव आणि राजपूतच्या गुंडांनी पडूळकरला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणारे आरोपीनही अटक होणार आहेत.

आडूळला पाहणी, हर्सूलमधून अटक

आडूळच्या महिला डॉक्टरकडून गर्भपात करून घेतल्याचे पडूळकरने सांगितल्यावर छावणी ठाण्यातील उपनिरीक्षक सोपान नरळे, अंमलदार सुमित पवार, मंगेश शिंदे, योगेश राऊत, मिना जाधव यांच्या पथकाने आडूळला छापा मारला. तेथे जाऊन माहिती घेतल्यावर तेथे क्लिनिक चालविणारी महिला डॉ. शबाना अश्पाक शहा-सय्यद ही हर्सूल भागातही दुसरे क्लिनिक चालवित असल्याचे समजले. त्यावरून रविवारी पथकाने हर्सूल भागात छापा मारला आणि डॉ. शबानाला अटक केली.

गर्भलिंग निदान करणारा डॉ. राजपूत कोण?

सुनील पडूळकरने एजंट ज्ञानेश्वर जाधवच्या मध्यस्थीने डॉ. राजपूतकडे गर्भलिंग निदान केले होते. सूतगिरणी चौकातून राहुल नावाच्या व्यक्तीने पडूळकरच्या पत्नीला दुचाकीवर बसवून नेले होते. त्यामुळे आता डॉ. राजपूत नेमका कोण?, राहुल नावाचा व्यक्ती कोण? याचा छावणी पोलिस तपास करीत आहेत. आमठाण्याच्या डॉ. राजपूतचा यात काही संबंध आहे का? हेदेखील तपासले जात आहे.

जुन्या रॅकेटशी कनेक्शन

आरोपी एजंट जाधव हा वालसा-खालसा (ता. भोकरदन) येथील रहिवासी आहे. त्याचे डीएमएलटी शिक्षण झाले असून तो पूर्वी लॅब चालवित होता. मात्र, नंतर त्याने एजंटगिरी सुरू केल्याचे समोर आले. दरम्यान, तो डॉ. राजपूतच्या संपर्कात होता म्हणजे हा राजपूतही सिल्लोड भागातील असण्याची शक्यता आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी उघडकीस आणलेले रॅकेटही सिल्लोड आणि भोकरदन भागातच जास्त अॅक्टिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून जुन्या रॅकेटमधील अनेकजण यात सहभागी असू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news