एक्झिट पोलपेक्षा चांगल्या जागा मिळतील; काँग्रेस नेत्यांना विश्वास

एक्झिट पोलपेक्षा चांगल्या जागा मिळतील; काँग्रेस नेत्यांना विश्वास

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसंदर्भात कालपासून आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा चांगल्या जागा काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मिळतील, असा विश्वास रविवारी (दि.२) सर्व राज्यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत २९५ जागा जिंकण्याचा विश्वास काँग्रेसला आहे. मात्र कालपासून आलेल्या सर्वच एक्झिट पोल्सने पुन्हा स्पष्ट बहुमतासह एनडीए सरकार सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज पक्षाचे सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेत्यांशी दिल्लीतील पक्ष मुख्यालयातून जाहीर संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी आपापल्या राज्यातील परिस्थिती सांगत किती जागा निवडून येऊ शकतात, यावर भाष्य केले. महाराष्ट्रात काँग्रेसला १६ तर मविआला ३८-४० जागा मिळतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासह, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील एक्झिट पोलमध्ये जे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्यापेक्षा काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी अधिक चांगली कामगिरी करेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की,"एक्झिट पोल संपूर्णपणे बोगस आहेत. हे एक्झिट पोल म्हणजे इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळल्या जात असलेल्या मानसिक खेळाचा भाग आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे."

या संवादादरम्यान बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने राज्यात १७ जागा लढवल्या आहेत. त्यापैकी १६ जागा पक्ष जिंकेल तर महाविकास आघाडीला ४८ पैकी ३८-४० जागा नक्कीच मिळतील. देशाचा मूड भाजपविरोधी आहे. देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. एक्झिट पोल विश्वासार्ह नसून कोणाला तरी खुश करण्यासाठी आणि लोकांना घाबरवण्यासाठी आहेत." असेही ते म्हणाले.

कोणत्या राज्यात किती जागा अपेक्षित?

महाराष्ट्र – काँग्रेस १६ तर मविआ ३८-४०
बिहार – २०
झारखंड – ८-१०
हिमाचल प्रदेश – २
कर्नाटक – १८
पंजाब – ९
राजस्थान १२-१३
गुजरात ४-५
हरियाणा – ८
आसाम – ७

कोण कोण नेते उपस्थित?

जयराम रमेश यांच्यासोबत झालेल्या या संवादादरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, उत्तर प्रदेशचे अजय राय, आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह, बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ. अखिलेश प्रसाद सिंह, राजस्थान प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटसारा, गुजरात प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सूक्खु, हरियाणा प्रदेशाध्यक्ष उदय भान आदी नेते सहभागी होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news