जागतिक डास दिवस : डासांविरोधातील कीटकनाशकांची परिणामकारकता घटतेय | पुढारी

जागतिक डास दिवस : डासांविरोधातील कीटकनाशकांची परिणामकारकता घटतेय

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी कीटकनाशक औषधांचा वापर केला जातो. मात्र, विषाणूंप्रमाणे डासांमध्येही कीटकनाशकांच्या विरोधात जनुकीय प्रतिरोध (रेझिस्टन्स) निर्माण झाला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव करणार्‍या कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत आहे. सध्या डासांच्या नियंत्रणासाठी पायरेथॉईड वर्गातील कीटकनाशकांचा वापर होत आहे.

कोरोना काळात विषाणूमध्ये नानाविध प्रकारे म्युटेशन (उत्परिवर्तन) झाले आणि त्यामुळे विषाणूचे स्वरूप बदलत गेले. त्याचप्रमाणे डासांना नष्ट करण्यासाठी सलग तीन वर्षे एकच कीटकनाशक वापरल्यास डासांमध्येही जनुकीय बदल होतात आणि त्यांच्यावर कीटकनाशकांचा परिणाम कमी होतो. त्यामुळे औषध फवारणी, धूर फवारणी केल्यावरही डासांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

डास अत्यंत उपद्रवी कीटक आहेत. अनेक आजारांच्या जंतूंचे वाहक असल्यामुळे अनिष्टही आहेत. डासांच्या अनेक वंशांपैकी नॉफेलीस, क्युलेक्स व ईडीस हे तीन वंश मानवी वैद्यकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे सामान्यतः बहुतेकांना माहीत आहेत.
क्युलेक्समुळे हत्तीरोगाचा, नॉफेलीसमुळे हिवतापाचा तर ईडीस डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचा प्रसार करतात, अशी माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.

कीटकनाशकांना प्रतिरोध येण्याची कारणे :
1. कीटकांमधील उच्चतम अनुवंशिकता
2. कीटकनाशकांचा सततचा वापर
3. योग्य मात्रेचा अभाव
4. त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास न करता वापर
5. दोन कीटकनाशकांचा एकत्र वापर

डासांची वैशिष्ट्ये…
डासांचे नियंत्रण करण्यासाठी डासांच्या सवयींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. ईडीस व अ‍ॅनोफेलीस डासांची मादी स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाण्यात अंडी घालतात. ईडीस डास दिवसा चावतो, तर क्युलेक्स अ‍ॅनोफेलीस डास संध्याकाळी किंवा रात्री चावतात. अ‍ॅनोफेलीस डास चावल्यानंतर भिंतीवर विश्रांती घेतो तर ईडीस डास अंधार्‍या खोलीत लोंबकळणार्‍या वस्तूंवर विश्रांती घेतो. या सवयींचा अभ्यास करून कीटकनाशकांची निवड केली जाते. एकाच कीटकनाशकाच्या मोठ्या प्रमाणातील व सतत वापरामुळे त्याची परिणामकारकता कमी होते, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले.

 

सध्या डासांना मारण्यासाठी सिंथेटिक पायरेथॉईड या कीटकनाशकाचा वापर केला जातो. बहुतांश ठिकाणी रसायनाला प्रतिरोध निर्माण झाला आहे. यामध्ये अद्याप नवीन ’मोलिक्यूल’ तयार झालेले नाही. त्यामुळे एकीकडे औषधांना कीटकांमध्ये निर्माण होणारा प्रतिरोध पाहता पुढचा काळ आव्हानात्मक असणार आहे. कीटकनाशकांचा वापर एका मर्यादेत करणे आवश्यक असून, त्यांचा सततचा वापर धोकादायक असतो.
           – डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विभाग

हेही वाचा:

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत लवकरच बैठक : चंद्रकांत पाटील

अमेरिकेने २१ भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवले, कायदेशीर कारवाईचा इशारा

 

Back to top button