ओतूरला जनावरे, कुत्र्यांचा सुळसुळाट | पुढारी

ओतूरला जनावरे, कुत्र्यांचा सुळसुळाट

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ओतूर गावठाण हद्दीत मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, भटक्या कुत्र्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
ओतूर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणाबरोबरच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न प्रलंबित आहे. गावात कचर्‍याच्या ढिगार्‍यांच्या आसपास कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात वावर असतो.

या कचर्‍यात खाणे शोधण्यासाठी टोळीने कुत्र्यांची भटकंती सुरू असते. मुख्य बाजारपेठेतील हॉटेल, मासळी बाजार, चिकन आणि मटणाच्या दुकानांच्या आसपास ही टोळकी फिरत असते. रस्त्यावरून जाणार्‍या ग्रामस्थांना, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच दुचाकीचालक यांना या कुत्र्यांच्या त्रास नित्याचाच झाला आहे. काही दिवसांपूर्वी ओतूर गावठाणात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून काही जणांना चावा घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत त्वरेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

गावात रोगराई पसरण्याची भीती

भटक्या कुत्र्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रासले असून, परिसरात दिवसेंदिवस भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली आहे. याशिवाय भटकी कुत्री एकमेकांना चावून जखमी होणार्‍या कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरात मटण, चिकन विकणार्‍या व्यापार्‍यांची संख्या मोठी आहे. व्यापारी कापत असलेल्या कोंबड्या, बकर्‍यांच्या आतड्या उघड्यावर टाकत असल्यामुळे ही भटकी कुत्री त्याच्यावर ताव मारीत आहेत.

परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. सकाळी शाळेत, तर संध्याकाळी ट्यूशनला जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कळपाने फिरणार्‍या या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून, बाहेर पडताना या मुलांना धडकी भरते. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

– शशिकांत डुंबरे, ग्रामस्थ, ओतूर

Back to top button