शिरूर तालुक्यात अचानक 13 टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

शिरूर तालुक्यात अचानक 13 टँकरने पाणीपुरवठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुरेसा पाऊस होऊनही जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 38 गावांत 26 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात शिरूर तालुक्यात अचानक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 13 टँकर सुरू केले आहेत. तीव्र उन्हाळा असणार्‍या मे, जून महिन्यातही पाणीटंचाई भासली नाही अशा शिरूर तालुक्यात सरासरी 63 टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. असे असताना 2 ऑगस्टपासून 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पावसाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले, तरी पाणीटंचाईच्या झळा कायम असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनाकडून पाणीपुरवठा केले जाणारे सर्व टँकर खासगी आहेत. शहरासह जिल्ह्यात पावसाला जुलै महिन्यात सुरुवात झाली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर कमी आहे. आंबेगाव, जुन्नर, खेड, पुरंदर आणि शिरूर या पाच तालुक्यांतील 38 गावांमधील वाड्या-वस्त्यांवर 98 हजार 949 नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आतापर्यंत सुरू असलेले टँकर बंद होणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी नव्याने शिरूर तालुक्यात अचानक 13 टँकर सुरू करावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मे, जून महिन्यांतील तीव्र उन्हाळ्यात एकाही टँकरची आवश्यकता भासली नव्हती.

प्रशासनाची भिस्त खासगी टँकरचालकांवर
जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या असून, टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सर्व भिस्त खासगी टँकरचालकांवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

तालुका गावे (वाड्या) टँकर नागरिक
आंबेगाव 07 (44) 06 21597
खेड 17 (66) 07 17572
जुन्नर 13 (58) 06 16118
पुरंदर 07 (43) 07 9970
शिरूर 07 (64) 13 33692

हेही वाचा :

ब्रास बॅंड पथकांची आर्थिक स्थिति सावरेना ! पुण्यातील जवळपास 50 पथके कायमस्वरूपी बंद

काळजी घ्या ! पुणे शहरात आय फ्लूचे 6000 रुग्ण

Back to top button