Loksabha election | पदाधिकार्‍यांशी संवाद अन् मतदानाची आखणी.. | पुढारी

Loksabha election | पदाधिकार्‍यांशी संवाद अन् मतदानाची आखणी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी दिवसभर आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत सोमवारी होणार्‍या मतदानाच्या तयारीची आखणी केली. गेला महिनाभर दोन्ही बाजूंनी झालेला प्रचार आणि सभा यांच्या माध्यमातून सजग झालेले मतदार सोमवारी (दि. 13) त्यांचा कौल देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभांनंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांचे अनेक प्रमुख नेते पुण्यात निवडणूक प्रचारासाठी आले होते. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये थंड असलेले वातावरण गेल्या आठवड्यात तापू लागले. दोन्ही बाजूंनी देशपातळीवरील तसेच राज्यपातळी वरील मुद्दे प्रचारात आणण्यात आले. स्थानिक पातळीवरील विकासाच्या मुद्द्यांवरही चर्चा रंगली.

परराष्ट्रमंत्री जयशंकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी महायुतीतर्फे मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. धंगेकर यांच्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार शशी थरूर, ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या. विदर्भातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पुण्यात प्रचारासाठी तळ ठोकला होता.

दोन्ही बाजूंनी प्रचाराला शेवटच्या टप्प्यात वेग दिल्याचे दिसून आले. जाहीर प्रचाराची शनिवारी (दि. 11) सायंकाळी सांगता झाल्यानंतर दोन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदानाच्या दिवशीच्या तयारीवर भर दिला. प्रमुख कार्यकर्त्यांशी बूथवरील कार्यकर्त्यांच्या रचनेबाबत त्यांनी चर्चा केली. याबाबत बैठका झाल्या. गेला दीड महिना निवडणुकीच्या प्रचारानंतर सर्व पक्षांचे कार्यकर्ते आता मतदारराजांना मतदानाला घराबाहेर येण्याचे आवाहन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नियोजनाबाबत चर्चा : मोहोळ

मोहोळ यांनी आज दिवसभर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला. ते म्हणाले, दिवसभर मोबाईलवरून मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत सोमवारच्या नियोजनाबाबत चर्चा केली. डेक्कन जिमखाना परिसरात विरंगुळा म्हणून जुन्या मित्रांशी सायंकाळी तासभर गप्पा मारल्या. गेला दीड महिना प्रचाराची धामधूम होती. आजचा दिवस थोडा शांततेत गेला.

कार्यकर्त्यांशी साधला संवाद : धंगेकर

काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांनी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागांत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीची तयारी कशी राहील, याबाबत बूथपातळीवर कार्यकर्त्यांशी ते बोलले. दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सहकारनगर पोलिस ठाण्यासमोर आंदोलनाला बसले होते. त्यांच्यासमवेत धंगेकर आणि काँग्रेस, शिवसेनेचे स्थानिक नेतेही आंदोलनात सहभागी झाले.

हेही वाचा

Back to top button