अवघ्या 10 ते 50 पैशांत होणार हिमोग्लोबिनची चाचणी

अवघ्या 10 ते 50 पैशांत होणार हिमोग्लोबिनची चाचणी

पिलानी-झुंझनू : हिमोग्लोबिनच्या चाचणीसाठी पॅथॉलॉजी लॅबमध्ये बराच खर्च करावा लागतो. मात्र, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेच्या संशोधकांनी असे स्वदेशी बनावटीचे उपकरण तयार केले आहे, ज्या माध्यमातून केवळ 10 ते 50 पैशांत हिमोग्लोबिनची तपासणी होऊ शकते. वेैद्यकीय क्षेत्रातील या उपकरणाचे हस्तांतरण लवकरच केले जाणार असून, त्यानंतर थेट निर्मितीला प्रारंभ होऊ शकेल. येत्या काही महिन्यांत खुल्या बाजारात हे उपकरण उपलब्ध होऊ शकेल, असे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले आहे.

सिरी संस्थेचे संशोधक डॉ. सत्यम श्रीवास्तव यांनी तयार डिव्हाईसमध्ये स्ट्रीपच्या माध्यमातून रक्ताचे काही थेंब घातले जातील आणि त्यानंतर काही क्षणातच हिमोग्लोबिनच्या चाचणीची आकडेवारी स्क्रीनवर दिसून येईल, असे सांगितले. या उपकरणाचे आतापर्यंतचे सर्व प्रयोग अतिशय यशस्वी झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

संस्थेचे निर्देशक डॉ. पी. सी. पंचारिया यांनीही या तंत्रज्ञानाचे पहिल्या टप्प्यातील सर्व अहवाल अगदी बिनचूक असल्याचे आढळून आल्याचे येथे नमूद केले. या संस्थेने मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत मिशनअंतर्गत ही सिस्टीम विकसित केली आहे. हिमोग्लोबिनची तपासणी करणारे बॅटरीवर आधारित आयवोटी उपकरण असून, स्मार्टफोन अ‍ॅपच्या माध्यमातूनही ते कार्यरत ठेवता येते. यातील हिमोग्लोबिन डाटा किमान पाच वर्षे सुरक्षित राहू शकतो, असा दावा यात करण्यात आला आहे.

सध्याच्या अंदाजानुसार, यातील एक किट दोन हजार रुपयांच्या आसपास किमतीला बाजारात उपलब्ध असणार आहे आणि त्यात 100 स्ट्रीप असणार आहेत. या हिशेबाने प्रत्येक तपासणीला 10 पैसे ते 50 पैसे इतका खर्च येऊ शकतो, असा यातील संशोधकांचा अंदाज आहे. सध्या हिमोग्लोबिनच्या चाचणीला 100 ते 300 रुपये आकारले जातात आणि त्याचा अहवाल येण्यासाठी देखील काही अवधी द्यावा लागतो. मात्र, हे नवे उपकरण उपलब्ध झाल्यानंतर चाचणीचा अहवाल त्याच क्षणी स्क्रीनवर दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news